कोळसा मालधक्याने वणीकर त्रस्त
By admin | Published: August 29, 2016 12:56 AM2016-08-29T00:56:02+5:302016-08-29T00:56:02+5:30
शहरालगतच असलेला दगडी कोळशाचा मालधक्का वणीकरांना त्रस्त करून सोडत आहे. हा मालधक्का येथून हटविण्यासाठी
प्रदूषणात वाढ : रेल्वेस्थानकही होतात विद्रुप
वणी : शहरालगतच असलेला दगडी कोळशाचा मालधक्का वणीकरांना त्रस्त करून सोडत आहे. हा मालधक्का येथून हटविण्यासाठी वणीकर पाच वर्षांपासून सतत मागणी करीत आहे. मात्र रेल्वे मंत्रालयाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. जणू काही रेल्वे व वेकोली प्रशासनाने वणीकरांच्या आरोग्याशी खेळच मांडल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. मालधक्का येथून लवकरच हटणार असल्याच्या वावड्या तीन वर्षांपासून खासदारांच्या तोंडून उडविला जात आहे. मात्र याला अजूनही मूर्त रूप आले नाही.
इंग्रजाच्या काळापासून वणीला रेल्वेस्थानक आहे. विभागातील दगडी कोळसा व चूना भट्ट्यांचे उत्पादन विक्रमी होते. त्यामुळे त्याची वाहतूक करण्यासाठी येथे इंग्रजांनी रेल्वे स्थानकाची निर्मिती केली. कालांतराने येथून आदिलाबादपर्यंत रेल्वे लाईन टाकून वणीला मुंबईशी जोडण्यात आले. मात्र अनेक वर्षे या मार्गावरून प्रवासी रेल्वे सुरू झाली नाही. माजी रेल्वेमंत्री लालपुप्रसाद यादव यांनी वणीला रेल्वेच्या जाळ्यात विणले. येथून तीन रेल्वेगाड्या सुरू केल्या. मात्र त्यापैकी केवळ नंदीग्राम एक्सप्रेसचाच थांबा येथे देण्यात आला. रेल्वेस्टेशनचे रूप पालटले. मात्र या परिसरात असणाऱ्या १० कोळसा खाणीतून निघणारा कोळसा विद्युत केंद्रांना पाठविण्यासाठी रेल्वे स्थानकावरच मालधक्का बनविण्यात आला. ध्वनी व वायु प्रदूषणाचे भूत वणीकरांच्या मानगुटीवर बसले. ट्रकमधून कोळसा खाली टाकतात व तो रेल्वे वॅगनमध्ये भरताना कोळशाची धुळ हवेत उडतात. त्यामुळे रेल्वेस्टेशन परिसरातील घरे दररोज काळवंडतात. घराच्या छतावर व वाळायला टाकलेले कपडेसुद्धा दिवसभरात काळे पडतात, तर मग जनतेच्या हृदयात किती धुळ जात असेल, याचा अंदाज घेता येतो. तसेच जेसीबीने कोळसा उचलला जातो. त्या जेसीबीची घरघर रात्रंदिवस सुरू असते. या आवाजानेही जनता त्रस्त होत आहे. रेल्वे स्टेशन परिसरातील गाड्यांचा थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची वर्दळही वाढली आहे. परंतु रेल्वे स्टेशनवर बसावे कोठे, असा प्रश्न पडतो आहे. सर्वत्र कोळशाची धुळ साचलेली असते. बसणाऱ्यांच्या कपड्यालाही काळे डाग पडतातच. जर या त्रासातून वणीकरांची सुटका करायची असेल, तर येथील मालधक्का रेल्वेस्थानकापासून दूर नेणे गरजेचे आहे. यासाठी खासदार हंसराज अहीर यांनी रेल्वे मंत्र्यालयाला प्रस्तावही दिल्याचे समजते. रेल्वे मंत्रालयाने त्याला मंजुरात दिल्याचे अहीर यांनी वेळोवेळी वणीकरांना सांगितले. मालधक्यासाठी पेटूर ते कायर दरम्यानचे स्थळाची पाहणीही झाल्याचे सांगण्यात आले. मात्र अजूनही मालधक्का हटण्याचे चिन्ह दिसत नाही. आता अहीर यांना केंद्रात मंत्रीपद मिळाले आहे. त्यामुळे त्यांचे रेल्वे मंत्रालयावरील वजनही वाढले आहे. आतातरी मालधक्का हटवून रेल्वे स्थानकाला व जनतेला सुरक्षितता मिळेल, अशी वणीकरांना आशा आहे. (स्थानिक प्रतिनिधी)