काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये शीतयुद्ध
By Admin | Published: August 12, 2016 02:09 AM2016-08-12T02:09:06+5:302016-08-12T02:09:06+5:30
जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीत शीतयुद्ध सुरू असल्याचे दिसून येत आहे
जिल्हा परिषद : स्थायी समितीच्या बैठकीत उपाध्यक्षांना ‘प्रभारा’तून डावलल्याचे राजकारण
यवतमाळ : जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीत शीतयुद्ध सुरू असल्याचे दिसून येत आहे. स्थायी समितीच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी आणि काँगे्रस आघाडीची सत्ता आहे. त्यापूर्वी अडीच वर्षे राष्ट्रवादीने काँग्रेसला बाजूला सारून शिवसेना, भाजप, मनसे, अपक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली होती. परिणामी काँग्रेसला सत्तेबाहेर राहावे लागले होते. त्याचवेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील दरी रूंदावत गेली. मात्र दोन वर्षांपूर्वी या दोन्ही पक्षातील धुरीणांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. दोन्ही पक्षाच्या वरिष्ठांनी भावी काळातील धोके ओळखून एकत्रित येण्याचे निश्चित केले.
वरिष्ठांनी घेतलेल्या निर्णयानंतर जिल्हा परिषदेत दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी झाली. या आघाडीने सत्ता स्थापन केली. ठरल्यानुसार ज्या पक्षाचे सदस्य जास्त, त्या राष्ट्रवादीच्या वाट्याला अध्यक्षपद, तर उपाध्यक्षपद काँग्रेसच्या नशीबी आले. मात्र गेली दोन वर्षे या दोन्ही पक्षात सतत शीतयुद्ध सुरू असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि काही सदस्य काँग्रेसला जुमानत नसल्याचे स्पष्ट होत आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि सभापती मात्र सर्वांना सोबत घेऊन चालण्याची कसरत करीत आहे.
राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र असूनही त्यांच्यात वर्चस्वाची छुपी लढाई सुरू आहे. प्रशासनावर आपलाच वचक राहावा, यासाठी दोन्ही पक्षाचे पदाधिकारी प्रयत्नशील आहे. यातूनच त्यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले आहे. आत्तापर्यंत पडद्याआड सुरू असलेले हे युद्ध आता उघड झाले आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी सतत प्रशासनावर पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. यातून काँग्रेसमध्ये प्रचंड खदखद सुरू आहे. तथापि काँग्रेसचे काही वजनदार सदस्य मात्र आपला कार्यभाग साधून घेण्यात माहीर असल्याने त्यांना या शीतयुद्धात कोणतेही स्वारस्य नाही. आपले काम उरकून घेण्यासाठी ते राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशीही गोडीगुलाबीने वागत आहे. (शहर प्रतिनिधी)
सभापतीला सुत्रे देण्यामागील रहस्य गुलदस्त्यात
स्थायी समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असतात. मात्र त्यांच्या रजा कालावधीत, गैरहजेरीत अथवा अनुपस्थितीत उपाध्यक्ष अध्यक्षपद भूषवितात. राजकारणात तसे संकेत आहे. मात्र बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत आक्रीत घडले. अध्यक्ष बैठकीला उपस्थित नसताना आणि उपाध्यक्ष उपस्थित असतानाही, चक्क बांधकाम समिती सभापतींनी बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले. वास्तविक अध्यक्ष नसल्याने उपाध्यक्षांचा तो हक्क होता. तथापि उपाध्यक्ष काँग्रेसचे असल्याने जाणीवपूर्वक राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी आपला प्रभार आपल्याच पक्षाच्या सभापतींकडे सोपविला, हे स्पष्ट झाले. त्यामुळे या बैठकीत या दोन्ही पक्षातील सुदोपसुंदी उघड झाली आहे.