वणीत बंदला संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 09:51 PM2018-08-09T21:51:13+5:302018-08-09T21:52:22+5:30
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून गुरूवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र ‘बंद’ला वणीत समिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून गुरूवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र ‘बंद’ला वणीत समिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आली.
बंदमुळे वणी आगारातून गुरूवारी सकाळपासून लांब पल्ल्याची एकही बस सोडण्यात न आल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झालेत. सकाळच्या वेळी बसस्थानकावर काही प्रमाणात प्रवाशांची गर्दी होती. मात्र नंतर बसस्थानक परिसरात शुकशुकाट होता. शहरात बंदचा फारसा परिणाम दिसून आला नाही. या आगारातून दररोज १९० बसफेऱ्या होतात. गुरूवारी केवळ १०० फेºया झाल्या. परिणामी आगाराला चार लाखांचा फटका बसला. सकाळच्यावेळी बाजारपेठ काही प्रमाणात बंद होती. मात्र ११ वाजतानंतर ती सुरू झाली.
संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ व ईतर बहुजनवादी संघटनांच्यावतीने उपविभागीय अधिकाºयांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले. येथील शिवाजी चौकात १२ वाजताच्या सुमारास सर्व कार्यकर्ते एकत्र आले. पुतळ्याला माल्यार्पण करून जिजाऊ वंदना घेण्यात आली. त्यानंतर जोरदार घोषणाबाजी मोर्चेकरी वणी येथील उपविभागीय कार्यालयात पोहचले.
मराठा,धनगर व मुस्लीम समजाला आरक्षण लागू करावे, आरक्षण लागू करीत असताना कुठल्याही इतर समाज घटकाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, ओबीसी, कुणबी व मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी तालुका व जिल्हानिहाय स्वतंत्र वसतिगृह उभारण्यात यावे, मराठा मोर्चा दरम्यान समजातील युवकांवर लावण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे, अॅट्रासिटी कायद्याचा दूरउपयोग होणार नाही, यासाठी दुरुस्ती करण्यात यावी, यासह विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. यावेळी संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हा अध्यक्ष अजय धोबे, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष मंगेश खामनकर, संभाजी ब्रिगेडचे वणी तालुका अध्यक्ष विवेक ठाकरे, अभय पानघाटे , पांडुरंग मोडक, संदीप रिंगोले,यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मारेगाव व झरी तालुक्यातही बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला. मारेगावातील ७० टक्के प्रतिष्ठाने बंद होती. शाळा, महाविद्यालयांना सुटी दिल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.
पांढरकवडा शहर व तालुक्यात मोर्चा
पांढरकवडा तालुका मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, तिरळे कुणबी समाज संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. येथील टी पॉइंटवर सर्व मोर्चेकरी एकत्र आले. तेथून घोषणा देत एसडीओ कार्यालयावर हा मोर्चा पोहचला. त्यानंतर उपविभागीय अधिकाºयांना निवेदन देण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष वैशाली नहाते, माजी नगराध्यक्ष दादाराव रोडे, विजय गोडे, विठोबा भोयर, अॅड.गजानन खैरकार, विजय ठाकरे, प्रेमराव वखरे, मनोज भोयर, डॉ.अभिनय नहाते, अमोल राऊत यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. शहरात बंदला समिश्र प्रतिसाद होता. महामंडळाची प्रवासी वाहतूक पूर्णत: ठप्प होती. शाळा महाविद्यालयांना सुटी देण्यात आली.
प्रशासनाच्या लेटलतिफीचा विद्यार्थ्यांना फटका
बंदच्या पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचे यवतमाळच्या शिक्षणाधिकाºयांचे आदेश आदेश बुधवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास वणीत येऊन धडकले. त्यामुळे शिक्षकांची तारांबळ उडाली. शाळा, महाविद्यालयांना गुरूवारी सुटी आहे, याबाबत विद्यार्थी व पालक अनभिज्ञ होते. त्यामुळे ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी गुरूवारी सकाळी वणीत पोहचले. मात्र येथे पोहचल्यानंतर शाळा, महाविद्यालयांना सुटी असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना आल्यापावली परत जावे लागले.