यवतमाळात आरोग्य अधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 09:40 PM2020-09-28T21:40:58+5:302020-09-28T21:43:03+5:30
सोमवारी यवतमाळ जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील ८९ डॉक्टरांनी सामुहिक राजीनामे दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विविध मागण्यांचे निवेदन घेऊन भेटीसाठी गेलेल्या डॉक्टरांच्या शिष्टमंडळाला जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी अवमानजनक वागणूक दिल्याचा आरोप करीत सोमवारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील ८९ डॉक्टरांनी सामुहिक राजीनामे दिले. सायंकाळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांना सामुहिक राजीनामे सादर करीत असल्याबाबतचे निवेदन ‘मॅग्मो’ (राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना) संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विजय आकोलकर यांच्या नेतृत्वात देण्यात आले.
डॉ. पांचाळ यांनी या डॉक्टरांना बरेच समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. त्यामुळे मंगळवारी अकोल्याच्या आरोग्य उपसंचालकांना चर्चेसाठी पाचारण केले जाणार आहे. त्यातून मार्ग काढण्याचा व आंदोलन मागे घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीसुद्धा या डॉक्टरांना चर्चेसाठी बोलाविले असल्याची माहिती सीईओ डॉ. पांचाळ यांनी दिली. दरम्यान आंदोलक डॉक्टरांनी जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाईशिवाय माघार नाहीच अशी भूमिका घेत मंगळवारपासून मंडप टाकून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. शेजारील जिल्ह्यांचे वैद्यकीय अधिकारीही या आंदोलनात येथे सहभागी होणार आहे. एवढेच नव्हे तर राज्यभर आंदोलन उभे करण्याची तयारीही चालविली आहे. या डॉक्टरांच्या आंदोलनाला काही संघटनांनी पाठिंबाही जाहीर केला आहे. डॉक्टरांनी अचानक पुकारलेल्या या आंदोलनामुळे जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणा प्रभावित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आंदोलनात उतरलेल्या ‘मॅग्मो’ संघटनेतील सर्व वैद्यकीय अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांचा समावेश आहे. सोमवारी या डॉक्टरांचे शिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले. मात्र हे निवेदन न स्वीकारता जिल्हाधिकाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे. जिल्हाधिकारी कोविड काळात झालेल्या विविध बैठकांमध्येसुद्धा राजपत्रित अधिकारी असलेल्या डॉक्टरांना अवमानजनक वागणूक देतात, असभ्य भाषा व अप्रशासकीय शब्दांचा वापर करतात, डॉक्टर कोरोना महामारीत अविरत सेवा देत असताना त्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी खच्चीकरण करतात, आदी आरोप संघटनेने केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या वागणुकीला कंटाळून सर्व डॉक्टर सामूहिक राजीनामा देत असल्याचे ‘मॅग्मो’ संघटनेने स्पष्ट केले. तसे निवेदनही सीईओंना देण्यात आले.
यवतमाळचे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रचंड मानसिक त्रास व अपमानास्पद वागणूक दिली आहे. त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी अन्यथा राज्यभर वैद्यकीय अधिकारी कामबंद आंदोलनात सहभागी होतील.
- डॉ. राजेश गायकवाड, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मॅग्मो संघटना.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सात मागण्या केल्या. त्यातील आमच्या स्तरावर असलेल्या मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिले. मात्र काही मागण्यांचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर होवू शकत नाही. आढावा बैठक सुरू असताना वैद्यकीय अधिकारी मधातच उठून जातात, हा प्रशासनाचा अपमान नाही का ?, ‘माझे कुटुंब - माझी जबाबदारी’ याबाबत विचारणा केली यात अपमान कुणाचा? निवासी उपजिल्हाधिकारी व काही तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनाही वस्तूस्थिती माहीत आहे. यापेक्षा जास्त काही सांगू शकत नाही.
- एम.डी. सिंह, जिल्हाधिकारी, यवतमाळ