कळंब तहसीलच्या उपक्रमाची जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल
By admin | Published: January 8, 2016 03:19 AM2016-01-08T03:19:22+5:302016-01-08T03:19:22+5:30
शेतकऱ्यांना क्लिष्ट वाटणाऱ्या कायद्यांचा गोष्टींतून बोध व्हावा, गोष्टीरुपाने जमीन व्यवहार निती समजावी,
कळंब : शेतकऱ्यांना क्लिष्ट वाटणाऱ्या कायद्यांचा गोष्टींतून बोध व्हावा, गोष्टीरुपाने जमीन व्यवहार निती समजावी, यासाठी कळंब तहसील कार्यालयाने पुढाकार घेतला. फलकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जनजागृती करण्याचा अनोखा प्रयोग सर्वांच्या कौतुकास पात्र ठरला. विशेष म्हणजे, या उपक्रमाची जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दखल घेत प्रत्यक्ष पाहणी केली.
जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते यांनी हा उपक्रम पाहण्यासाठी तहसील कार्यालयाला भेट दिली. सर्व फलकांची अतिशय बारकाईने पाहणी केली. एवढेच नाही तर, फलकाचे वाचनही केले. तहसीलदार संतोष काकडे यांच्याकडून त्यांनी सर्व माहिती जाणून घेतली. यापुढेही असेच नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्याची अपेक्षाही व्यक्त केली.
ग्रामीण भागात शेतजमिनीची खरेदी-विक्री, गहाणखत, पंच खरेदी, सरकारी जमिनीवरील अतिक्रमण, भाऊबंदकीतील वाद विचारात घेऊन सोप्या गोष्टीरुपाने ही माहिती मांडण्यात आली. त्यामुळे येणाऱ्या काळात या बोधकथेतून बोध घेत सकारात्मक परिणाम दिसून येतील असा, विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. (तालुका प्रतिनिधी)