कलेक्टर साहेब काय चाललंय हे... यांना कोण आवरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:42 AM2021-04-09T04:42:04+5:302021-04-09T04:42:04+5:30
फोटो ज्ञानेश्वर ठाकरे लोकमत न्यूज नेटवर्क महागाव : तालुक्यात रेती चोरी हा अनेकांचा मुख्य व्यवसाय बनला आहे. यात अनेक ...
फोटो
ज्ञानेश्वर ठाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : तालुक्यात रेती चोरी हा अनेकांचा मुख्य व्यवसाय बनला आहे. यात अनेक नेते, पुढारी आणि पडद्याआड शासकीय अधिकारी, कर्मचारी गुंतले आहेत. तालुका रेती तस्करीचे केंद्रबिंदू बनला आहे. भोसा, दहीसावळी रेती घाटांवरून तब्बल दहा ट्रेझर बोट आणि पाच जेसीबींच्या सहाय्याने दररोज शेकडो ब्रास रेतीचे उत्खनन केले जात आहे. या तस्करांना कोण आवरणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महसूल यंत्रणेने डोळ्यावर कातडे ओढल्यासारखी स्थिती आहे. जुने गेले आणि नवीन आले तरी हेच हाल आहे. त्यामुळे सामान्य नागरिक एकच सवाल करत आहे. ‘कलेक्टर साहेब हे... काय चाललंय, यांना कोण आवर घालणार’. एक रॉयल्टी दोन-तीनवेळा वापरली जाते. त्याची साधी तपासणीही होत नाही. प्रादेशिक परिवहन अधिकारी मूग गिळून आहेत. दररोज तालुक्याच्या विविध मार्गांवरून रेतीची ओव्हरलोड वाहतूक केली जात आहे. कित्येक वाहने कालबाह्य झाली आहेत. तरीही रेतीची वाहतूक मोठ्या दिमाखात करत आहे.
तालुक्यात नदीची थडी फोडून रस्ता तयार केला जातो. लाखो रुपये देऊन शेत मालकांना रस्ता विकत मागितला जातो. हा गंभीर विषय असला तरी प्रशासनाला त्याचे काही सोयरसूतक नाही. १०० किलोमीटर अंतराची रॉयल्टी फाडून त्याच मार्गावर दोन ते तीन खेपा टाकल्या जातात, हे विशेष. नदीपात्रात ट्रेझर बोट आणि जेसीबी उतरवणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, रेती माफियांना यातून सूट दिली जात आहे. महसूल, पोलीस, प्रादेशिक परिवहन विभाग रेती माफियांच्या दावणीला बांधला गेल्याने रेती तस्कर चांगलेच निर्ढावले आहेत. त्यामुळे रेती माफियांनी नदीपात्राची चाळणी केली आहे.
बॉक्स
पावत्यांचा अजब फंडा
पहिली खेप १० हजार रुपये पावती, दुसरी खेप आठ हजार रुपये पावती, तिसरी खेप पाच हजार रुपये पावती हा फंडा वापरून एकाच रॉयल्टीवर हा रेती वाहतुकीचा खेळ सुरू आहे. दररोज जवळपास तीस ते चाळीस टिप्परमधून तालुक्यात रेती वाहतूक सुरूच आहे.
कोट
रेती घाटांची पाहणी करण्यासाठी पथक रवाना झाले. ओव्हरलोड वाहतुकीसंदर्भात प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पत्र दिले. परंतु, अद्याप त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही.
- नामदेव इसळकर, तहसीलदार, महागाव.