जिल्हाधिकारी घेणार शिकवणी वर्ग
By admin | Published: January 20, 2015 12:15 AM2015-01-20T00:15:45+5:302015-01-20T00:15:45+5:30
जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षाला लागून असलेल्या विभागातील कर्मचाऱ्यांचा अघोषित ‘लंच बे्रक’ जनतेसाठी डोकेदुखी ठरला होता.
यवतमाळ : जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षाला लागून असलेल्या विभागातील कर्मचाऱ्यांचा अघोषित ‘लंच बे्रक’ जनतेसाठी डोकेदुखी ठरला होता. या विभागातील सर्व टेबल रिकामे राहात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने मांडले होते. याची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे. कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आदर्श वर्तणुकीचे धडे देण्यासाठी दररोज एक तास शिकवणी वर्ग घेतला जाणार आहे.
जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी याबाबत लेखी आदेश काढला आहेत. २० जानेवारीपासून याची अंमलबजावणी होणार आहे. यामध्ये आदर्श कर्मचारी कसे व्हावे, याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. दररोज सायंकाळी ५ ते ६ हा कार्यालयीन वेळ निश्चित करण्यात आला आहे. ५० कर्मचाऱ्यांचा एक गट यासाठी ठरविण्यात आला आहे. टप्प्या टप्प्याने सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहेत. वर्षभर ही मोहीम चालणार आहे.
प्रशिक्षक म्हणून अनुभवी कर्मचारी असणार आहे. यामध्ये नायब तहसीलदारांसह विविध अधिकाऱ्यांचा समावेश आहे. प्रशिक्षणादरम्यान माहितीचा अधिकार, टिपणी लेखन, पत्रव्यवहार, सौजन्य, संवाद कौशल्य, वेळ व्यवस्थापन, राहणीमान, वाणी यासह विविध विषयांचा समावेश आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आदर्श कर्मचारी घडावा आणि कामाचा वेग वाढावा. सर्वसामान्यांची कामे अधिक गतीने व्हावी, हाच मुख्य उद्देश आहे. (शहर वार्ताहर)