जिल्हा परिषद शाळेत शिकलेला शुभम होणार कलेक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 11:41 PM2018-12-21T23:41:45+5:302018-12-21T23:43:33+5:30

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक स्वत:च्या मुलांना आपल्या शाळेत का शिकवित नाहीत? झाडून साऱ्या शिक्षणप्रेमींना पडणारा हा प्रश्न शुभमने पार खोडून काढला आहे. त्याचे आईबाबा ज्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते, त्याच कुर्लीच्या शाळेत त्यांनी शुभमला शिकवले.

Collector of zilla parishad learned Shubham | जिल्हा परिषद शाळेत शिकलेला शुभम होणार कलेक्टर

जिल्हा परिषद शाळेत शिकलेला शुभम होणार कलेक्टर

Next
ठळक मुद्देलोकसेवा परीक्षा उत्तीर्ण : घाटंजी तालुक्यात बालपण, दिग्रसमध्ये शिक्षण अन् यवतमाळात भाड्याचे घर

अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक स्वत:च्या मुलांना आपल्या शाळेत का शिकवित नाहीत? झाडून साऱ्या शिक्षणप्रेमींना पडणारा हा प्रश्न शुभमने पार खोडून काढला आहे. त्याचे आईबाबा ज्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते, त्याच कुर्लीच्या शाळेत त्यांनी शुभमला शिकवले. अन् इतके शिकवले की, आता तो कलेक्टर होणार आहे! देशपातळीवरील यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला असून आयएएस कॅडर निवडले आहे. अवघ्या २३ व्या वर्षी जिल्हाधिकारी होणारा शुभम म्हणजे जिल्ह्यातील गुणवत्तेचे शुभलक्षणच.
शुभम शुक्ला हे या भावी कलेक्टरचे नाव. वडील राजेश शुक्ला आणि आई प्रतिभा शुक्ला. दोघेही कुर्ली (ता. घाटंजी) या खेड्यात शिक्षक होते. त्यांच्या पोटी १६ एप्रिल १९९५ रोजी शुभमचा जन्म झाला. ज्या शाळेत आईबाबा शिकवित होते, त्याच शाळेत शुभम चौथीपर्यंत शिकला. तिथे पुढची शाळाच नव्हती. मध्यंतरी यवतमाळातील भाड्याच्या घरात शुभम राहिला. नंतर आईने शुभमला दिग्रसच्या सैनिकी शाळेत घातले. बालपणापासून अभ्यासाची तीव्र ओढ असलेला शुभम शाळेतल्या दरवर्षी वादविवाद स्पर्धेत पहिला यायचा. कबड्डी स्पर्धा हे तर त्याचे पॅशन होते. ‘शाळेतली अशी एकही स्पर्धा नव्हती की, ज्यात तो जिंकला नाही’ असे शुभमची आई अभिमानाने सांगते. पाचवी ते दहावी दिग्रसमध्ये शिकताना तो दहावीत ९५ टक्के गुणांसह मेरिट आला होता. त्यानंतर नागपुरात अकरावी-बारावी (विज्ञान) केले. बारावीतही ८५ टक्के मिळविले. त्यानंतर तू काय करणार, असे विचारताच शुभमने सांगितले मी यूपीएससीची तयारी करणार, त्यासाठी दिल्लीलाच जाणार. खेड्यात राहणारे आईबाबा म्हणाले, लांब जाऊ नको. त्याऐवजी पुण्याला जा. पण शुभमने जिद्द सोडली नाही. तो दिल्लीला गेला. आत्मराम सनातन कॉलेजमध्ये त्याने हिस्ट्री आॅनर विषय घेऊन बीएची पदवी घेतली. तर दुसरीकडे यूपीएससीची तयारी केली. पहिल्या प्रयत्नात त्याला किंचित गुण कमी पडले. पण दुसºया प्रयत्नात त्याने मुख्य लेखी परीक्षा पास केलीय. गुरुवारीच या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांची यादी घोषित करण्यात आली. त्यात शुभमचे नाव पाहून शिक्षक असलेले त्याचे आईबाबा आनंदाने गदगदून गेले.
शुभमची आई प्रतिभा सध्या रुढा (ता. कळंब) या दुर्गम गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहे. तर वडील राजेश हे नाकापार्डी (ता. यवतमाळ) जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत. सकाळी जाणे आणि सायंकाळी ७ वाजता यवतमाळातील तिरुपती नगरातील घरी परतणे, हा त्यांचा नित्यक्रम. मुलाचे यश ऐकताच त्याचे संपूर्ण बालपण त्यांच्या डोळ्यापुढे तरळून गेले.

आई, तुझी बदली मीच करेन
कुर्लीच्या (ता. घाटंजी) जिल्हा परिषद शाळेत शिकणे आणि त्याच खेड्यात राहणे, हेच शुभमचे बालपण होते. पण अधिक शिकण्याच्या उर्मीने तो नेहमी आईला म्हणायचा, आपण यवतमाळात तरी राहू. पण आई म्हणायची, आमची बदली आमच्या हाती नसते. इथे नोकरी आहे म्हणून इथेच राहावे लागेल. एकदा छोट्याशा शुभमने आईला विचारले, कोण करत असते गं तुझी बदली? आई म्हणाली, ते मोठे आयएएस अधिकारी असतात. त्यावर शुभम म्हणाला होता, एक दिवस मीच आयएएस होईन आणि तुझी बदली मीच करेन. हे शब्द शब्दश: जरी खरे ठरणार नसले, तरी शुभम आज आयएएस कॅडर निवडून फेब्रुवारीत मुलाखतीला सामोरा जाणार आहे. एकंदर ५ हजार उमेदवारांतून केवळ १९०० विद्यार्थी मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यात शुभमचा समावेश आहे.

Web Title: Collector of zilla parishad learned Shubham

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.