जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन जप्त

By admin | Published: April 14, 2016 01:58 AM2016-04-14T01:58:59+5:302016-04-14T01:58:59+5:30

चापडोह प्रकल्पासाठी संपादित जमिनीचा मोबदला देण्यास टाळाटाळ होत असल्याने एका शेतकऱ्याने जिल्हा कचेरीवर जप्ती आणून ...

Collector's Vehicles seized | जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन जप्त

जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन जप्त

Next

रामनगरचा शेतकरी : २९ लाख ८४ हजार वसुलीचे प्रकरण
यवतमाळ : चापडोह प्रकल्पासाठी संपादित जमिनीचा मोबदला देण्यास टाळाटाळ होत असल्याने एका शेतकऱ्याने जिल्हा कचेरीवर जप्ती आणून बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन जप्त केले. या कारवाईने एकच खळबळ उडाली.
यवतमाळ तालुक्यातील चापडोह प्रकल्पात बजाबाई लक्ष्मण राठोड रा. रामनगर (यावली) यांची १० हेक्टर जमीन संपादित करण्यात आली होती. या जमिनीचा वाढीव मोबदला म्हणून १३ लाख ३० हजार रुपये मंजूर झाले होते. परंतु विशेष भूसंपादन अधिकारी लघु सिंचन यांनी ही रक्कम देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे बजाबाई राठोड यांचे वारस छगन लक्ष्मण राठोड यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यावर २९ जुलै २०१० रोजी न्यायालयाने वॉरंट बजाविला. परंतु विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांनी पैशासाठी मुदत मागितली. त्यावरून त्यावेळी मुदतवाढ देण्यात आली. मात्र मोबदल्याचे पैसेच दिले नाही. छगन राठोड यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने शासनाविरुद्ध डिक्री पारित केली. वाढीव मोबदल्याचे व्याजासह २९ लाख ८४ हजार ६५५ रुपये झाले आहे. या रकमेच्या वसुलीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन जप्त करण्याचे आदेश दिले. हा डिक्री आदेश घेऊन शेतकरी छगन राठोड, त्यांचा मुलगा वैभव राठोड, न्यायालयाचे बेलिफ बी.बी. भारशंकर, संतोष जाधव आणि अनिल निकम बुधवारी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. जिल्हाधिकारी बैठकीत असल्याने जप्तीची कारवाई सायंकाळी ५.३० वाजता करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्याला आपल्या कक्षात बोलावून त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु शेतकरी काही एक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. चापडोह प्रकल्प जीवन प्राधिकरणाच्या अखत्यारीत येत असल्याने या पैशासाठी जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता दिनेश बोरकर यांना पाचारण करण्यात आले. त्यांनीही पैशाबाबत असमर्थता दर्शविली. शेतकऱ्याने पुढच्या मुदतीच्या धनादेशाची मागणी केली. परंतु तेही मान्य झाले नाही. शेवटी जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन (एम.एच.२९-एम-९७७९) जप्त करण्यात आले. या कारवाईनंतर उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन सुपूर्दनाम्यावर परत करण्यात आले. (शहर वार्ताहर)

Web Title: Collector's Vehicles seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.