चला मुलांनो, लोणार सरोवर अन् वेरुळची लेणी पाहा ! ‘समग्र शिक्षा’तून करा मज्जा ! 

By अविनाश साबापुरे | Published: March 22, 2024 05:00 PM2024-03-22T17:00:34+5:302024-03-22T17:01:01+5:30

अभियानाच्या खर्चातून आता जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना चार दिवसांची मोफत सहल घडविली जाणार आहे.

Come, children, see Lonar Lake and Verul Caves! new scheme for zp student | चला मुलांनो, लोणार सरोवर अन् वेरुळची लेणी पाहा ! ‘समग्र शिक्षा’तून करा मज्जा ! 

चला मुलांनो, लोणार सरोवर अन् वेरुळची लेणी पाहा ! ‘समग्र शिक्षा’तून करा मज्जा ! 

यवतमाळ : कुणाचे आईबाबा मजूरदार तर कुणाचे शेतकरी... दोन घासांच्या विवंचनातून त्यांना फुरसद मिळेना.. मग ते मुलांच्या सहलीसाठी कुठून वेळ काढणार? कुठून पैसे जुळविणार? याच समस्येवर समग्र शिक्षा अभियानातून उत्तर शोधण्यात आले आहे. अभियानाच्या खर्चातून आता जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना चार दिवसांची मोफत सहल घडविली जाणार आहे. त्यात लोणारचे जगप्रसिद्ध सरोवर, जायकवाडी प्रकल्प, वेरुळची लेणी अशा ठिकाणांचे दर्शन बालमनाला घडणार आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच बाह्य जगाचाही अभ्यास व्हावा, यासाठी समग्र शिक्षा अभियानातून सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षीपासून त्याकरिता ‘राष्ट्रीय आविष्कार अभियाना’चा प्रारंभ करण्यात आला आहे. या योजनेतून ‘राज्यांतर्गत’ आणि ‘परराज्यात’ अशा दोन प्रकारच्या सहली आयोजित करण्याची तरतूद आहे. त्यानुसार प्रति विद्यार्थी खर्चाची तजविज अभियानातून केली जाते. सहल कुठे न्यावी, याचा निर्णय संबंधित जिल्हा परिषद घेते. 

यंदा यवतमाळ जिल्हा परिषदेने २६ मार्च ते २९ मार्च अशी चार दिवसांची ‘राज्यांतर्गत’ (एक्स्पोजर व्हीजिट विदिन स्टेट) सहल आयोजित केली आहे. छत्रपती संभाजीनगर व परिसरातील विविध ऐतिहासिक, भौगोलिक, प्रेक्षणीय स्थळांचे विद्यार्थ्यांना दर्शन घडविले जाणार आहे. ही सहल २६ मार्च रोजी सकाळी ७ वाजता जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरातून रवाना होणार आहे. 

चार दिवसात काय काय पाहणार?

२६ मार्च : बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवर. रात्री छत्रपती संभाजीनगरात मुक्काम.

२७ मार्च : छत्रपती संभाजीनगर परिसरातील दौलताबाद, खुलताबाद, वेरुळ, पवनचक्की, बीवी का मकबरा. रात्री छत्रपती संभाजीनगरात मुक्काम.

२८ मार्च : जायकवाडी प्रकल्प, पैठण, शिर्डी, शनिशिंगणापूर. रात्री छत्रपती संभाजीनगरात मुक्काम.

२९ मार्च : संतनगरी शेगाव येथे गजानन महाराज मंदिर दर्शन व परतीचा प्रवास. 

शिक्षणाधिकाऱ्यांची सूचना...

सहलीला येताना विद्यार्थ्यांनी शाळेचे आयकार्ड, स्वत:चे आधार कार्ड, पालकांचे संमतीपत्र सोबत आणावे, अशी सूचना शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा यांनी केली आहे. चार दिवसांच्या सहलीसाठी आवश्यक ते कपडे घेऊन वेळेवर शिक्षकांसह उपस्थित राहण्याबाबत त्यांनी कळविले आहे.

या शाळेच्या विद्यार्थ्यांची तिकिट झाली फायनल...

- प्राथमिक विभाग

तळणी (आर्णी), वाटखेड बु. (बाभूळगाव), धामणगाव देव (दारव्हा), डेहणी (दिग्रस), सायतखर्डा (घाटंजी), कात्री (कळंब), फुलसावंगी (महागाव), कोसारा (मारेगाव), मालखेड बु. (नेर), पाथरी (पांढरकवडा), वसंतवाडी (पुसद), वनाेजा (राळेगाव), नागपूर प. (उमरखेड), मानकी (वणी), लोहारा (यवतमाळ), माथार्जुन (झरी) येथील जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक शाळांचे विद्यार्थी सहलीसाठी निवडले गेले आहेत. 

- माध्यमिक विभाग

लोणबेहळ (आर्णी), सावर (बाभूळगाव), सरुळ (बाभूळगाव), लोही (दारव्हा), पिंपळगाव रुईकर (कळंब), फुलसावंगी (महागाव), माणिकवाडा (नेर), पैनगंगानगर (पुसद), वाढोणा बाजार (राळेगाव), कुरई (वणी), बेलोरा (पुसद), इचोरी (यवतमाळ), पाटण (झरी), पांढरकवडा, उमरखेड, यवतमाळ शहरातील जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची सहलीसाठी निवड झाली आहे.

Web Title: Come, children, see Lonar Lake and Verul Caves! new scheme for zp student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.