उमरखड तालुक्यात पाणीटंचाई उपययोजनांना सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:42 AM2021-03-26T04:42:12+5:302021-03-26T04:42:12+5:30
उमरखेड : दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी तालुक्यामध्ये तीव्र पाणीटंचाईला सुरुवात झाली. याबाबत जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणार्थ योग्य नियोजन करण्याचा प्रस्ताव पंचायत ...
उमरखेड : दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी तालुक्यामध्ये तीव्र पाणीटंचाईला सुरुवात झाली. याबाबत जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणार्थ योग्य नियोजन करण्याचा प्रस्ताव पंचायत समिती सभापती तथा जिल्हा जलव्यवस्थापन समितीचे सदस्य प्रज्ञानंद खडसे यांनी जलव्यवस्थापन समितीच्या सभेत मांडला आहे.
जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीने ठरावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे तालुक्यातील पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांना हालचालींना वेग आला आहे. जलव्यवस्थापन समितीकडून दरवर्षी पाणीटंचाई बाबत उपाययोजना होत असतात. मात्र, तालुक्यात टंचाई असलेल्या गावांमध्ये जलस्त्रोत नसल्यामुळे दरवर्षीच टंचाई निवारणाची केवळ मलमपट्टी केली जाते.
यंत्रणा तोकडी असल्यामुळे काळे पाषाण असलेल्या तालुक्यातील गावांमध्ये फेब्रुवारीपासूनच पाणीटंचाई सदृश परिस्थिती उद्भवते . मागील वर्षी २०१९-२०२० या काळात तालुक्यात ४२ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या होत्या. परंतु त्याचे पैसे अद्याप तालुक्याला मिळाले नाही. यंदाही भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची चिन्हे असताना प्रशासनाने काय नियोजन केले, असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला. त्यावर पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी २०१९-२०२० मध्ये तात्पुरती नळ योजना ११, नळ योजना विशेष दुरुस्ती २५ , खासगी विहीर अधिग्रहण ३४५ व टँकरने पाणीपुरवठा करणे १९, अशा एकूण ४०० उपाययोजना घेण्यात आल्याचे सांगितले.
बॉक्स
मुळावा येथे नळ योजनेसाठी प्रस्ताव
उमरखेड तालुक्यात टंचाईग्रस्त गावांना तसेच मुळावा येथे उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई असल्यामुळे तेथे पूरक नळ योजनेसाठी विशेष प्रस्ताव तयार करावा, असे सभापतींनी सभेत सूचित केले. तालुक्यात पाणीटंचाई निवारणार्थ तातडीने उपाययाेजना करण्याची मागणी त्यांनी केली.