व्यावसायिक ६४ गॅस सिलिंडरच्या मालकाचा महिनाभरापासून शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 05:41 PM2024-10-03T17:41:39+5:302024-10-03T17:42:54+5:30
दहेगाव येथे टँकरमधून गॅस रिफिलिंग : वडकी येथील पोलिसांनी केली होती कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : दहेगाव येथील ढाब्यावर २८ ऑगस्ट रोजी एचपी गॅस कंपनीच्या टँकरमधून व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये गॅस भरताना वडकी पोलिसांनी धाड टाकली. त्यावेळी तिथे ६४ व्यावसायिक गॅस सिलिंडर, दोन वाहने आणि गॅस टँकर आढळून आले होते. वाहने जप्त करण्यात आली होती. दोन जणांना अटक करण्यात आली होती. परंतु, याठिकाणी आढळलेले ६४ गॅस सिलिंडर कोणाचे याचा शोध पोलिस महिनाभरापासून घेत आहे.
धाडीच्या कारवाईनंतर या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. मध्यंतरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पत्रानुसार गॅस टँकर आणि ६४ व्यावसायिक गॅस सिलिंडर खापरी येथील एच.पी. गॅस कंपनीकडे सुपूर्द करण्यात आले. एक महिन्याच्या प्रदीर्घ काळात धाडीत जप्त करण्यात आलेल्या व्यावसायिक सिलिंडरबाबत कोणत्याही व्यावसायिकाने त्यांचे गॅस सिलेंडर हरविले किंवा चोरीला गेले असल्याबाबतची तक्रार कोणत्याही पोलिस ठाण्यात केलेली नसल्याची माहिती आहे.
दहेगाव धाब्याजवळच्या क्षेत्रात राहणाऱ्या व्यावसायिकांचे हे सिलेंडर आहे. या व्यावसायिकांनी कोणाच्यातरी मध्यस्ताच्या माध्यमातून हे सिलिंडर स्वस्तात गॅस रिफिलिंग करण्याकरिता दिले असल्याचा संशय आहे. मध्यस्थ गॅस एजन्सी किंवा हॉकर असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने तपास करण्याची आवश्यकता आहे. तसेच, गॅस टँकर चालकांनी यापूर्वी असेच प्रकार केले होते की काय व अशा प्रकारात आणखी कोण सामील आहे याचा छडा लावण्याची गरज आहे. ६४ व्यावसायिक गॅस सिलिंडरबाबतचा तपास सुरू आहे, असे स्थानिक गुन्हे शाखेचे तपास अधिकारी पोलिस निरीक्षक देवकते यांनी प्रतिनिधीला सांगितले.
अनेक महिन्यांपासून सुरु होता प्रकार
दहेगाव येथील ढाब्यावर मागील काही महिन्यांपासून टँकरमधून गॅस काढून सिलिंडरमध्ये भरण्याचा प्रकार सुरू होता. भरलेल्या सिलिंडरची वाहतूक करण्यासाठी स्पेशल वाहनेही तैनात करण्यात आली होती. पोलिसांनी धाड टाकून हा प्रकार उघडकीस आणला होता. परंतु, या प्रकारामागे आणखी कोण आहे याचा छडा लावण्यात आलेला नाही. गंभीर प्रकार असल्याने या प्रकरणात सखोल तपास होण्याची गरज आहे.