शिक्षण आयुक्त तीन पंचायत समित्यांची घेणार झाडाझडती, शिक्षण विभाग अलर्ट
By अविनाश साबापुरे | Published: April 18, 2023 07:10 PM2023-04-18T19:10:16+5:302023-04-18T19:12:32+5:30
‘एलपीडी’मध्ये असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षणाची खबरबात घेण्यासाठी खुद्द राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे बुधवारी दिवसभर जिल्ह्यात तळ ठोकणार आहेत.
यवतमाळ : ‘एलपीडी’मध्ये असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षणाची खबरबात घेण्यासाठी खुद्द राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे बुधवारी दिवसभर जिल्ह्यात तळ ठोकणार आहेत. आयुक्तांच्या या दौऱ्यामुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागासह पंचायत समित्यांमध्येही मंगळवारी दिवसभर कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ पाहायला मिळाली. सूरज मांढरे हे सुरुवातीला वर्धा जिल्हा परिषदेत भेट देऊन कळंब पंचायत समितीमध्ये धडकणार आहेत.
तेथील बीआरसी केंद्रातील कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर कळंब येथीलच चिंतामणी हायस्कूल व तालुक्यातील सुकळी येथील उपक्रमशील जिल्हा परिषद शाळेला भेट देणार आहेत. या शाळेतील विद्यार्थीभिमुख उपक्रमांची भुरळ संपूर्ण राज्याला आधीच पडलेली आहे. तीच कीर्ती ऐकून खुद्द आयुक्तही या शाळेला भेट देणार आहेत. दुपारी मांढरे हे यवतमाळ तालुक्यातील आदर्श शाळा तिवसा येथील ‘भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळे’ची पाहणी करतील. त्यानंतर यवतमाळ पंचायत समिती, जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग या कार्यालयांनाही ते भेटी देणार आहेत. तसेच बाभूळगाव पंचायत समिती व तेथील बीआरसी केंद्राचा आढावा घेतल्यानंतर चिमणाबागापूर येथील विवेकानंद विद्यालयाला भेट देऊन ते सायंकाळी अमरावतीकडे रवाना होणार आहेत.
आधार, बदल्यांवर होणार का चर्चा?
शाळांमधील उपक्रमांच्या पाहणीनंतर शिक्षण आयुक्त सूरज मांढरे हे कार्यालयीन कामकाजाचीही माहिती घेणार आहेत. याच सुमारास शिक्षक संघटनांनी त्यांना निवेदन देण्याचीही तयारी केली आहे. विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन झाल्याशिवाय वेतन अनुदान दिले जाणार नाही, या आयुक्तांच्या आदेशाने जिल्ह्यातील शेकडो शिक्षक अडचणीत सापडले आहेत. तसेच जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांचेही गुऱ्हाळ सुरूच आहे. हे मुद्दे आयुक्त आपल्या अजेंड्यावर घेणार का, याकडे लक्ष लागले आहे.
आयुक्तांसाठी दुपारची शाळा
सध्या कडक उन्हाळ्यामुळे शाळा सकाळ पाळीत भरविल्या जात आहेत. मात्र बुधवारी शिक्षण आयुक्त जिल्ह्यात येणार असून ते विविध शाळांना भेटी देणार आहेत. त्यावेळी विद्यार्थी शाळांमध्ये हजर दिसावे, याकरिता संबंधित शाळा दुपार पाळीत भरविण्याचे तोंडी आदेश देण्यात आले आहेत.