आयुक्तांचा दौरा, अध्यक्ष अनभिज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:51 AM2017-07-20T00:51:10+5:302017-07-20T00:51:10+5:30
जिल्हा परिषदेत सध्या ‘गुड खिचडी’ सरकार असल्याने वितंडवाद वाढला असून प्रशासन मुजोर झाले आहे.
जिल्हा परिषद : माहितीच दिली नाही, प्रशासनाची अशीही मुजोरी
रवींद्र चांदेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषदेत सध्या ‘गुड खिचडी’ सरकार असल्याने वितंडवाद वाढला असून प्रशासन मुजोर झाले आहे. जिल्हा परिषदेत नेमके काय घडत आहे, याबाबत खुद्द अध्यक्षच अंधारात असल्याचे वास्तव पुढे येत आहे.
विभागीय आयुक्त पियूष सिंग मंगळवारी प्रथमच जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठक आटोपून जिल्हा परिषदेकडे धाव घेतली. जिल्हा परिषदेत त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली.
जिल्हा परिषदेत प्रथमच विभागीय आयुक्त आले असताना याबाबत अध्यक्ष माधुरी अनिल आडे यांना साधी कल्पनाही नसल्याचे वास्तव समोर आले आहे. आयुक्त तब्बल दोन ते तीन तास जिल्हा परिषदेत असताना अध्यक्षांना त्याची साधी कल्पनाही असू नये, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हा परिषदेच्या प्रमुखालाच वास्तूत कोण आले आणि कोण गेले, याची कल्पना नसेल, तर सामान्य नागरिकांना न्याय मिळणार कसा, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. प्रशासनाने अध्यक्षांना आयुक्त येत असल्याची साधी कल्पनाही दिली नाही. यावरून प्रशासन प्रचंड मुजोर झाल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा परिषदेचे प्रमुख हे अध्यक्ष असताना प्रशासन त्यांनाच अंधारात ठेवून आपला कार्यभाग साधत असल्याचे यावरून स्पष्ट झाले. वास्तविक प्रमुख या नात्याने प्रशासनाने त्यांना माहिती देणे अपेक्षित होते. मात्र प्रशासनाच्या लेखी पदाधिकारी बिनकामी असल्याचे यातून दिसून येते. शासनाने अध्यक्षांना राज्यमंत्र्यांचा दर्जा दिला. लोकप्रतिनिधी म्हणून जनता त्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी येते. मात्र शासनाने प्रशासकीय अधिकार काढून घेतल्याने प्रशासनाच्या लेखी पदाधिकारी बिनकामी झाले आहे.
ही झूल काय कामाची ?
जिल्हा परिषदेत खुद्द अध्यक्षांनाच अंधारात ठेवून कारभार चालविला जात असेल, तर अध्यक्षपदाची ही झूल काय कामाची, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अध्यक्षांनाच अंधारात ठेवले जात असेल, तर सदस्यांना विचारणार तरी कोण, असाही प्रश्न आहे. जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या लेखी क्षुल्लक ठरत असतील, तर सामान्यांच्या समस्या सोडविणार कोण, असाही प्रश्न आहे. तथापि ‘गुड खिचडी’ सरकारमुळेच यावेळी असे प्रसंग उद्भवत असल्याचे बोलले जाते. पदाधिकारी आणि प्रशासनात समन्वय नसल्याचा हा परिपाक असल्याचे दिसून येते. यात नेमके वरचढ कोण, हा वादाचा मुद्दा असल्याने वितंडवाद वाढतच आहे.
आज पालकमंत्र्यांची बैठक गाजणार
जिल्हा परिषदेमध्ये गुरुवार २० जुलै रोजी पालकमंत्री मदन येरावार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक होत आहेत. या बैठकीत आयुक्तांच्या दौऱ्यापासून खुद्द अध्यक्षांनाच अनभिज्ञ ठेवण्याचा प्रशासनाचा कारभार गाजण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकारी-सदस्य विरुद्ध प्रशासन असा वाद सुरू आहे. अध्यक्षांना अंधारात ठेवण्याच्या बुधवारच्या प्रकारामुळे हा वाद आणखी वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
विभागीय आयुक्त येणार असल्याची प्रशासनाने साधी कल्पना दिली नाही. उद्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक होत आहे. त्यात प्रशासनाला याबाबत जाब मागणार आहे.
- माधुरी आडे
अध्यक्ष, जि.प. यवतमाळ.