यवतमाळच्या बीडीओंना आयुक्तांचा दणका
By admin | Published: March 12, 2017 12:54 AM2017-03-12T00:54:12+5:302017-03-12T00:54:12+5:30
जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना अध्ययन सक्षम करण्यासाठी पंचायत समितीच्या परिसरात बहुअपंग प्रवर्ग प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले.
बहुअपंग प्रशिक्षण केंद्र : खुलासा मागितला
यवतमाळ : जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना अध्ययन सक्षम करण्यासाठी पंचायत समितीच्या परिसरात बहुअपंग प्रवर्ग प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले. मात्र पंचायत समितीने विविध योजनांचे साहित्य ठेवण्यासाठी या केंद्राचा गोदामासारखा वापर सुरू केला. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच विभागीय आयुक्तांनी बीडीओंकडून खुलासा मागविला आहे.
‘जिल्ह्यातील साडेआठ हजार अपंगांच्या शिक्षणात बीडीओंची बाधा’ असे वृत्त १६ फेब्रुवारी रोजी ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्याची विभागीय आयुक्तांनी तातडीने दखल घेत या केंद्रातील साहित्य बाहेर काढण्याचे आदेश दिले. शिवाय, १७ लाख रुपये खर्चून अपंगांसाठी उभारण्यात आलेले हे केंद्र साहित्य ठेवण्यासाठी कसे काय वापरले, याबाबत बीडीओंकडून खुलासाही मागितला आहे.
अपंग विद्यार्थ्यांना स्पिच थेरेपी, फिजिओ थेरेपी, मानसिक मूल्यमापन करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी यवतमाळ पंचायत समितीच्या परिसरात प्रशिक्षण केंद्राची इमारत बांधण्यात आली. मात्र, सुरुवातीपासूनच ही इमारत समावेशित शिक्षण कक्षाकडे न सोपविता पंचायत समितीने आपल्या विविध योजनांचे साहित्य तेथे भरून ठेवले.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी वारंवार सूचना करूनही ही इमारत खाली करून देण्यात आली नाही. अखेर ‘लोकमत’ने १६ फेब्रुवारी रोजी वृत्त प्रकाशित करताच थेट विभागीय आयुक्तांनी सीईओंना याबाबत जाब विचारला. बीडीओंकडून खुलासा घेण्याचेही आदेश त्यांनी दिले.
चावी नेमकी कुणाकडे?
दरम्यान, ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच यवतमाळ पंचायत समितीने अपंगांच्या प्रशिक्षण केंद्रात ठेवलेले आपले साहित्य तातडीने बाहेर काढून घेतले. मात्र, अद्यापही हे केंद्र रीतसर समावेशित शिक्षण कक्षाकडे सोपविण्यात आलेले नाही. या इमारतीची चावी समावेशित शिक्षण कक्षाकडे देण्यात आली नाही. पंचायत समितीतील नेमक्या कोणत्या कर्मचाऱ्याकडे ही चावी देण्यात आली, याचे उत्तर कुणीही द्यायला तयार नाही.