भाजपच्या मंत्र्यांपुढे काँग्रेसचा सामान्य चेहरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 06:00 AM2019-10-18T06:00:00+5:302019-10-18T06:00:16+5:30

यवतमाळ मतदारसंघात एकच व्यक्ती सलग दोन वेळा निवडून आल्याचा अलिकडचा इतिहास नाही, हा इतिहास बदलविण्यात मदन येरावार यशस्वी ठरतात का याकडे नजरा लागल्या आहेत. भाजपचे मदन येरावार, काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर व शिवसेना बंडखोर संतोष ढवळे यांच्यात ही लढत होत असली तरी ढवळे नेमके कुणाला नुकसानकारक ठरणार याचा अंदाज बांधणे राजकीय तज्ज्ञांनाही कठीण होऊन बसले आहे.

Common face of Congress before BJP ministers | भाजपच्या मंत्र्यांपुढे काँग्रेसचा सामान्य चेहरा

भाजपच्या मंत्र्यांपुढे काँग्रेसचा सामान्य चेहरा

Next
ठळक मुद्देतिहेरी लढत : शिवसेनेचे बंडखोर संतोष ढवळे कुणाच्या फायद्याचे?, संभ्रम कायम

भाजपचे वजनदार मंत्री, आर्थिक दृष्ट्या संपन्न मदन येरावार यांच्यापुढे यवतमाळ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने जनसामान्यांचा चेहरा म्हणून बाळासाहेब मांगुळकर यांना रिंगणात उतरविले आहे. शिवसेनेचे बंडखोर संतोष ढवळे यांचीही उमेदवारी असल्याने येथे तिहेरी सामना होणार आहे.
यवतमाळ मतदारसंघात एकच व्यक्ती सलग दोन वेळा निवडून आल्याचा अलिकडचा इतिहास नाही, हा इतिहास बदलविण्यात मदन येरावार यशस्वी ठरतात का याकडे नजरा लागल्या आहेत. भाजपचे मदन येरावार, काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर व शिवसेना बंडखोर संतोष ढवळे यांच्यात ही लढत होत असली तरी ढवळे नेमके कुणाला नुकसानकारक ठरणार याचा अंदाज बांधणे राजकीय तज्ज्ञांनाही कठीण होऊन बसले आहे. यवतमाळ मतदारसंघातील भाजपचा कारभार मुंबईपर्यंत गाजला आहे. त्यातून पक्ष, कार्यकर्ते व मतदारांमध्ये भाजप विरोधात निर्माण झालेल्या नाराजीचा फायदा काँग्रेस व सेना बंडखोराला होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. २०१४ च्या निवडणुकीत अखेरच्या क्षणी सेनेतील महत्वाच्या घटकांनी साथ सोडल्याने व काहींनी आघाडीचा धर्म सोडून भाजपला साथ दिल्याने संतोष ढवळे यांचा अवघ्या १२०० मतांनी पराभव झाला होता. पक्षाच्या चिन्हावर त्यावेळी ५० हजारांवर मिळालेली मते डोळ्यापुढे ठेऊनच ढवळे पुन्हा रिंगणात उतरले. मात्र आता अपक्ष म्हणून यापैकी किती मतदार ढवळेंच्या पाठीशी उभे राहतात हे पाहणेही तेवढेच महत्वाचे ठरते. या मतदारसंघात १३ उमेदवार आपले नशीब आजमावित आहेत.
विकास कामांसाठी आणलेला कोट्यवधींचा निधी, लोकसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवाराला मिळालेली ३७ हजार मतांची आघाडी, नगरपरिषदेतील सत्ता, जिल्हा परिषदेतील सत्तेचा सहभाग आदी बाबी भाजपकडून आक्रमकपणे मतदारांपुढे ठेवल्या जात आहे. परंतु गेल्या पाच वर्षात भाजपची गाजलेली प्रकरणे, पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांचा निर्माण झालेला दुरावा, वाढलेली गुन्हेगारी, त्याला मिळणारा राजकीय व पर्यायाने प्रशासकीय सपोर्ट, त्यातूनच व्यापारी, व्यावसायिक व जनमाणसात निर्माण झालेली दहशत आदीबाबी भाजपसाठी नुकसानकारक ठरत आहे. त्यातच आता यवतमाळ मतदारसंघात भाषिक वादही जन्म घेतो की काय अशी हूरहूर पहायला मिळते आहे.
बेंबळाचे पाणी न मिळणे, रस्ते उखडणे, त्यामुळे मनुष्य व वाहनांचे आरोग्य धोक्यात येणे आदी बाबी मतदारांमध्ये आधीच प्रमुख चर्चेचा विषय ठरल्या आहेत. त्याच वेळी ‘माझी उमेदवारी यवतमाळातील गुन्हेगारी मोडित काढण्यासाठी’ हे काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर यांचे आवाहन मतदारासाठी आशादायी ठरत आहे. दहशतीत वावरणाऱ्या जनतेसाठी यानिमित्ताने आपला कुणी तरी वाली आहे अशी भावना निर्माण झाली आहे. त्याचा फायदा काँग्रेसला अधिक प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुन्हेगारीच्या निमित्ताने भाजपकडून काँग्रेसवर पलटवार केले जात असले तरी तो इतिहास झाल्याने त्याचा जनतेवर फार काही परिणाम होताना दिसत नाही.
प्रहारचे बिपीन चौधरी, वंचित बहुजन आघाडीचे योगेश देशमुख पारवेकर, स्वतंत्र विदर्भाचा झेंडा घेऊन अ‍ॅड. अमोल बोरखडे, बसपाचे संदीप देवकते हेसुद्धा मतदारसंघात आपला प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. एकीकडे समाजातीलच नव्हे तर भाजप व संघ परिवारातील प्रतिष्ठीत मंडळी निवडणुकीत दुरावा ठेऊन असताना काँग्रेसमध्ये मात्र अनेक गट-तट एकजुटीने काम करताना दिसत
आहे.
 

Web Title: Common face of Congress before BJP ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.