कंपनी म्हणते, मुबलक ‘डीपी’, तरी गावांमध्ये पोहोचेना वीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 01:40 PM2020-12-15T13:40:33+5:302020-12-15T14:33:42+5:30
Yawatmal News electricity यवतमाळ तालुक्यातील कोळंबी सर्कलमध्ये येणाऱ्या पारध तांड्यामध्ये तर वीज डीपी जळाल्यानंतर तब्बल १५ दिवसाने कृषी फिडर बसविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गाव आणि शेतशिवार यांच्यामध्ये विजेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून वीज कंपनीने कृषी फिडर आणि गावठाण फिडर अशी स्वतंत्र रचना केली. यानंतर मागणी करताच तत्काळ कृषी फिडर उपलब्ध होईल, अशा सूचना वीज कंपनीने दिल्या आहेत. प्रत्यक्षात शेतशिवारात मागणी केल्यानंतरही आठ ते दहा दिवसांनी कृषी फिडर उपलब्ध होते. यवतमाळ तालुक्यातील कोळंबी सर्कलमध्ये येणाऱ्या पारध तांड्यामध्ये तर वीज डीपी जळाल्यानंतर तब्बल १५ दिवसाने कृषी फिडर बसविण्यात आले. आता याठिकाणी फिडर असले तरी लाईन नाही. अशा परिस्थितीत शेतशिवारातील पिके करपत आहेत. अनेकांनी हरभरा लागवडीची व्यवस्था केली. परंतु वीज नसल्याने त्यांची पेरणी थांबली आहे. शिवारात असलेला गहू, तूर पाण्याअभावी वाळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. सर्कलमधून विनंती केल्यानंतरही या शेतकऱ्यांना डीपी मिळाली नव्हती. यामुळे शेतकऱ्यांनी वीज कंपनी कार्यालयावर धडक देत डीपी आणली. याशिवाय डीपीसाठी लागणारे वायर आणि इतर साहित्य खरेदी करण्यासाठी त्यांना शेतकऱ्यांकडून लोकवर्गणी गोळा करावी लागली. आता गत दोन दिवसांपासून वीज नाही. यामुळे शेतकरी चिंतेत आहे. अशीच परिस्थिती वारंवार प्रत्येक सर्कलमध्ये निर्माण होते. वीज कंपनी मात्र डीपी मुबलक उपलब्ध असल्याचे सांगत आहे. मागणी आल्यावर आम्ही तत्काळ पुरवठा करतो, असे सांगितले जाते.
तक्रार करूनही प्रतीक्षेतच
डीपी ओव्हरलोड होतात, अनेक ठिकाणी एबी स्विच खराब होतात, वायर गुंततात यामुळे डीपी अनेकवेळा स्फोट होऊन जळतात. या डीपीकडे लक्ष देण्यासाठी कंत्राटदारांवर काम सोपविण्यात आले आहे. मात्र अपुऱ्या मनुष्यबळाअभावी तक्रारींकडे लक्षच दिले जात नाही.
शेतकऱ्यांना पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे पिकांचे नुकसान
सध्याची वीज पुरवठ्याची व्यवस्था वीज कंपनीवरच अवलंबून आहे. मात्र त्याला पर्याय असलेली साैर ऊर्जा फिडर उपलब्ध नाही. जिल्ह्यात मांजर्डा आणि अकोलाबाजार वगळता अशी व्यवस्था झाली नाही. यामुळे पाण्याअभावी नुकसान होत आहे.
रोहित्र जळाल्याने तूर, हरभरा, गव्हाला फटका
- विजेचा संपूर्ण पुरवठा कृषी फिडरवर अवलंबून असतो. रोहित्र जळाल्याने शेतशिवारांमध्ये तूर, हरभरा आणि गव्हाच्या पिकाला फटका बसत आहे.
- अनेक भागामध्ये रोहित्र सुरू असले तरी कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे आठ तास मिळणारा विजेचा पुरवठा वारंवार खंडित होतो. यातून ओलित रखडले आहे.
जिल्ह्यात वीज वितरण कंपनीकडे पुरेसे रोहित्र उपलब्ध आहेत. ज्या ठिकाणावरून तक्रारी येतात, त्या ठिकाणी तत्काळ कारवाई केली जाते. गत महिन्यामध्ये ऑईलचा प्राॅब्लेम होता. मात्र आता तशा कुठल्याच अडचणी नाहीत. कुठलेच रोहित्र बंद नाही.
- संजय, प्रशासन अधिकारी, वीज कंपनी
आमच्या भागात रोहित्र जळाले आणि मागणी केल्यानंतर १५ दिवसाने रोहित्राचा पुरवठा झाला. आज गावामध्ये रोहित्र बसविले आहे. मात्र दोन तासांची वीज मिळाली. आता तर दाेन दिवसांपासून लाईनच बंद आहे. पारध तांडा शिवारात शेतातील पिके पाण्याअभावी वाळत आहे.
- शेषराव जाधव, शेतकरी, पारध तांडा, ता.यवतमाळ