कृषी केंद्र चालकांसाठी होता कंपनीचा दुबई टूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 06:00 AM2020-03-12T06:00:00+5:302020-03-12T06:00:15+5:30
कोरोनाबाबत आता गावखेड्यातील नागरिकांनी प्रचंड धास्ती घेतली आहे. पुण्यात कोरोनाचे पाच रुग्ण आढळल्याने प्रत्येकालाच भीती वाटत आहे. यातूनच यवतमाळातील तीन कुटुंब प्रवासाला असताना त्यांच्या सोबत असणाऱ्या सहप्रवासी तरुणीला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. तशा बातम्याही राज्यस्तरावरून आल्या. यानंतर मात्र ज्या टूर कंपनीच्या माध्यमातून हे कुटुंब फिरायला गेले त्या कंपनीकडून मिळालेली नावांची यादीच थेट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कृषी केंद्र चालकांसाठी कंपन्यांकडून दुबई टूर ऑफर करण्यात आला होता. यामध्ये यवतमाळातील तीन कुटुंबातील दहा सदस्य दुबईत फिरण्यास गेले होते. त्याच टूरमधील एका प्रवासी तरुणीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर यवतमाळातून गेलेल्या तीन कुटुंबातील सदस्यांच्या नावाची यादीच सोशल मीडियावर मंगळवार दुपारपासून व्हायरल होत आहे. यामुळे या कुटुंबाला आता अनेक अडचणी येत आहे.
कोरोनाबाबत आता गावखेड्यातील नागरिकांनी प्रचंड धास्ती घेतली आहे. पुण्यात कोरोनाचे पाच रुग्ण आढळल्याने प्रत्येकालाच भीती वाटत आहे. यातूनच यवतमाळातील तीन कुटुंब प्रवासाला असताना त्यांच्या सोबत असणाऱ्या सहप्रवासी तरुणीला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. तशा बातम्याही राज्यस्तरावरून आल्या. यानंतर मात्र ज्या टूर कंपनीच्या माध्यमातून हे कुटुंब फिरायला गेले त्या कंपनीकडून मिळालेली नावांची यादीच थेट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दक्षता म्हणून आरोग्य विभागाने या तीनही कुुटुंबांना निगराणीत ठेवले आहे. सध्या या तीनही कुटुंबांच्या घराकडे कुणी फिरकत नाही. इतकेच काय त्यांच्या घरी काम करणाऱ्या महिलांंनीसुद्धा स्वयंपाक, धुणी-भांडी करणे सोडून दिले आहे. यामुळे एका नव्याच समस्येला या कुुटुंबालासामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे हे कुटुंबीय २ मार्चला यवतमाळात पोहोचले. त्यानंतर ते आपले दैनंदिन कामकाज करीत होते. येथील आर्णी बायपासवरील एका मॉलमध्ये प्रचंड गर्दी असताना या कुटुंबातील काही सदस्यांनी खरेदीही केली आहे. आता मात्र त्यांच्याकडे कुणीच फिरकत नाही. नावासह यादी व्हायरल झाल्याने नातेवाईक व इतर मित्रांकडून चौकशीचे फोन सतत सुरू असल्याचे सांगण्यात आले.
खासगी डॉक्टरांकडे केले शंका निरसन
दुबईवरून भारतात आल्यानंतर या कुटुंबांची मुंबई विमानतळावर तपासणी झाली. त्यानंतर त्यांना पुढील प्रवासासाठी सोडण्यात आले. यवतमाळात आल्यानंतर या कुटुंबांनी खासगी डॉक्टरकडेही तपासणी करून घेतली. शहरातील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पार्टटाईम जॉब करणाऱ्या मेडिकलच्या प्राध्यापक डॉक्टरने या कुटुंबांची तपासणी केली. त्या डॉक्टरांनीही काहीच नसल्याचे सांगितले. त्यानंतरच हे कुटुंब बिनधास्तपणे दैनंदिन कामाला लागले होते. १० मार्चला आरोग्य यंत्रणेला ईमेल आल्यानंतर या कुटुंबाला पुन्हा निगराणीत घेण्यात आले आहे.
दहा हजार मास्कची विक्री, रुमालही ठरू शकतो पर्याय
कोरोनाच्या दहशतीने जिल्ह्यात १० हजार मास्कची विक्री झाली. तर आठ हजार हॅन्डवॉश सॅनेटरायझर विकले गेले आहे. मास्क एन-९५ मोठ्या प्रमाणात विकले जात आहे. मास्कला पर्याय म्हणून स्वच्छ धुतलेला साधा रुमालही निलगिरी तेलाचे थेंब टाकून वापरता येणे शक्य आहे. मास्कच वापरणे बंधनकारक नाही, अशी माहिती केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट संघटनेचे अध्यक्ष पंकज नानवाणी यांनी दिली.
तुळशीच्या पानाचे सेवन लाभदायक
तुळशीच्या पानाला आयुर्वेदात महत्त्व आहे. अॅन्टीबायोटिक म्हणून त्याकडे पाहण्यात येते. त्याचे अनेक वैद्यकीय उपयोगही आहे. कोरोना प्रतिबंधासाठी तुळशीचे पान नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होऊ शकते. नागरिकांनी तुळशीच्या पानाचे सेवन करावे, असे मत विविध आयुर्वेदाचार्यांनी नोंदविले आहे.
अशी घ्या दक्षता
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येक व्यक्तींने विशेष दक्षता घ्यावी. शक्यतोवर गर्दीच्या ठिकाणी जाऊच नये, सार्वजनिक सण-उत्सव, समारंभ, यात्रा टाळाव्या, प्रत्येक वेळी हात धुवावे, खोकलताना, शिंकताना रुमाल अथवा टिशू पेपर वापरावा, सतत सर्दी, कफ, ताप याचा त्रास असेल तर डॉक्टरांकडे तपासणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी केले.