जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत केवळ ३७ टक्के पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 11:24 PM2018-07-10T23:24:10+5:302018-07-10T23:24:40+5:30
गतवर्षीच्या दुष्काळानंतर यावर्षी जिल्हावासीयांना दमदार पावसाची अपेक्षा होती. मात्र आत्तापर्यंत जिल्ह्यात केवळ ३२ टक्केच पाऊस कोसळला. परिणामी जलप्रकल्प निम्मेही भरले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गतवर्षीच्या दुष्काळानंतर यावर्षी जिल्हावासीयांना दमदार पावसाची अपेक्षा होती. मात्र आत्तापर्यंत जिल्ह्यात केवळ ३२ टक्केच पाऊस कोसळला. परिणामी जलप्रकल्प निम्मेही भरले नाही.
यावर्षी मे महिन्याच्या शेवटी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसाची चाहूल लागताच जिल्हावासीयांना यावर्षी चांगला पाऊस कोसळण्याची अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. प्रत्यक्षात रोहिणी आणि मृग नक्षत्र सुरू होऊनही पावसाने हजेरी लावलीच नाही. जून महिन्यात पावसाने दडी मारली. यामुळे शेतकरी संकटात सापडले. जलप्रकल्पही जेमतेम २२ टक्केच भरले. आत्तापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ३७ टक्के पाऊस झाल्याने पुन्हा सर्वांचा जीव टांगणीला लागला आहे.
कमी पावसामुळे जिल्ह्यातील जलप्रकल्प निम्मेही भरले नाहीत. सध्या मोठ्या पूस प्रकल्पात १६.९७ टक्केच पाणीसाठा आहे. अरूणावती प्रकल्पात २१.५८, बेंबळा २६.८१, अडाण २९.०६, नवरगाव २३.१६, गोकी १०.५८, वाघाडी १७.२२, सायखेडा ३५.१४, अधरपूस ४५.७३, तर बोरगाव प्रकल्पत केवळ १.३६ टक्के जलसाठा आहे.
गतवर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात या प्रकल्पांमध्ये ३० टक्के जलसाठा होता. यावर्षी तो २२ टक्केवरच आला. यामुळे जिल्ह्याला अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पुढील नक्षात चांगला पाऊस झाल्यास जलप्रकल्प भरतील. अन्यथा जिल्हा पुन्हा दुष्काळाच्या खाईत लोटला जाण्याची शक्यता आहे.
वणी, झरी तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान
जिल्ह्यातील जलप्रकल्पाची पावसाची प्रतीक्षा असताना गेल्या २४ तासांत वणी आणि झरी तालुक्यात मात्र अतिवृष्टी झाली. या दोन्ही तालुक्यात सोमवारपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पैनगंगा, विदर्भा आदी नदींसह सर्वच नाले दुथडी भरून वाहात आहे. शेतांमध्ये पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.