कृषीच्या मूल्यांकनाअभावी अडला शेतजमिनीचा मोबदला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 08:53 PM2020-11-09T20:53:42+5:302020-11-09T20:58:43+5:30
एवढेच नव्हे तर रेल्वेसाठी लागणारी अतिरिक्त जागाही भूसंपादनाच्या कुठल्याही प्रक्रियेशिवाय ताब्यात घेवून काम सुरू करण्यात आले. हा प्रश्न कळंब येथील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मांडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मूल्यांकन अहवाल कृषी विभागाने सादर केला नाही. परिणामी शेतजमीन गेलेले शेतकरी मोबदल्यापासून वंचित आहेत. एवढेच नव्हे तर रेल्वेसाठी लागणारी अतिरिक्त जागाही भूसंपादनाच्या कुठल्याही प्रक्रियेशिवाय ताब्यात घेवून काम सुरू करण्यात आले. हा प्रश्न कळंब येथील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मांडला आहे.
थाळेगाव(पुनर्वसन) येथील २३ शेतकरी गेली काही महिन्यांपासून आपला प्रश्न मार्गी लागावा यासाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवित आहे. सोमवारी पुन्हा त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाला निवेदन सादर केले. गजानन खेर्डे, प्रदीप ढुमणे, सचिन माहुरे, प्रवीण गुल्हाने, महादेव लढी, आकाश कुटेमाटे, मोरेश्वर मडावी, रोशन गोरे आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीनिशी हे निवेदन सादर करण्यात आले आहे.
वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पाकरिता थाळेगाव(पुनर्वसन) येथील जमीन संपादित करण्यात आली. अनेकांच्या शेतात झाडे, इमारती, विहिरी, बोअरवेल आहेत. याचे कृषी विभागाकडून मूल्यांकन तातडीने करून अहवाल उपजिल्हाधिकारी कार्यालयाला पोहोचणे आवश्यक होते. जमिनी घेवून सात महिन्यांचा कालावधी लोटूनही हा अहवाल सादर झालेला नाही. प्रत्येकवेळी या शेतकऱ्यांना आश्वासने देण्यात आली.
अहवालास विलंब होत असल्याने या शेतकऱ्यांचा मोबदलाही लांबणीवर पडत आहे. आता या शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या तीन दिवसात अहवाल सादर न झाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पूर्वी संपादित करण्यात आलेली जमीन अपुरी पडत असल्याने या शेतकऱ्यांची वाढीव जागा घेण्यात आली. मात्र यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्यात आली नाही. त्यापूर्वीच काम सुरू करण्यात आले. ही प्रक्रिया राबवून अतिरिक्त घेण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला द्यावा, अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे.
दुसरीकडे या शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी लांबचा फेरा करावा लागतो. रेल्वेच्या कामामुळे शेताचे दोन तुकडे पडले आहेत. उंचच्या उंच भिंती बांधल्या गेल्या. चढून जाता येत नसल्याने दूरचा फेरा करून शेतजवळ करावे लागत आहे.