विद्यार्थ्यांचा कल स्पर्धा परीक्षांकडे
By admin | Published: May 31, 2014 11:48 PM2014-05-31T23:48:01+5:302014-05-31T23:48:01+5:30
आज सर्वत्र शिक्षणाचे मोठय़ा प्रमाणात बाजारीकरण झाल्यामुळे गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांंची मोठी फजिती झाली आहे. पैशाअभावी महागडे शिक्षण घेणे शक्य नसल्याने पुसद परिसरातील हजारो विद्यार्थ्यांनी
उच्च शिक्षणासाठी पैसा नाही : युवकांसाठी बेरोजगारी दूर करण्याचा एकमेव उपाय
पुसद : आज सर्वत्र शिक्षणाचे मोठय़ा प्रमाणात बाजारीकरण झाल्यामुळे गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांंची मोठी फजिती झाली आहे. पैशाअभावी महागडे शिक्षण घेणे शक्य नसल्याने पुसद परिसरातील हजारो विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली आहे. सध्या ग्रामीण विद्यार्थ्यांंमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यातल्या त्यात गरीब विद्यार्थ्यांंची संख्या जास्त आहे. पदवीपर्यंंतचे शिक्षण पूर्ण होऊन डीएड, बीएड, एमए, एमएसस्सी पार पडल्यानंतर नोकरीचे वांधे निर्माण होतात.
काही विद्यार्थ्यांंकडे पैसा असेल तर शिफारस नाही तर काहींकडे शिफारस आहे पण लाखो रुपये नाही. १५ ते २0 लाखापर्यंंत नोकरीसाठी रक्कम आणायची कुठून हा प्रश्न सुशिक्षित बेरोजगारांसमोर उभा ठाकला आहे. शेवटी त्यांच्यासमोर एकच पर्याय उरला, तो म्हणजे स्पर्धा परीक्षेचा. त्यामुळे काही काळापूर्वी स्पर्धा परीक्षांची फारशी माहिती नसणार्या विद्यार्थ्यांंनी त्याची मोठय़ा प्रमाणात माहिती घेणे सुरू केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांंची ही गरज लक्षात घेऊन पुसद परिसरात स्पर्धा परीक्षांचे केंद्र उघडण्याची गरज निर्माण झाली आहे.जीवनात यशस्वी होण्याची आशा बाळगून विद्यार्थी शहराच्या ठिकाणी खोली करून स्पर्धा परीक्षाच्या वर्गात प्रवेश घेतात.वाढत्या देणगी शुल्कामुळे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा केंद्रात प्रवेश घेत आहेत. त्यामुळे गुणवत्ता प्रधान राष्ट्रनिर्मितीसही मदत होईल, यात शंका नाही.स्वत:मधील क्षमता ओळखून विद्यार्थी कोणताही मोबदला न देता प्रथम श्रेणीचे अधिकारी होण्याची महत्वाकांक्षा बाळगत आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेतही दिवसेंदिवस आणखी स्पर्धा वाढणार हे नक्कीच. तरी पण ग्रामीण गरीब विद्यार्थ्यांंचा जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचा कल वाढत आहे. सहाव्या वेतन आयोगामुळे शिक्षकी पेशात देणगी मोठय़ा प्रमाणात वाढत आहे.तेवढी रक्कम देऊन नोकरी करण्यापेक्षा तेवढय़ा पगारात तीन ते चार गरीब होतकरू विद्यार्थी जीवन काढू शकतात. त्यामुळे बेरोजगारी तरी कमी होण्यास मदत होईल. अन्यथा गरीब गरीबच राहील व श्रीमंत दिवसेंदिवस श्रीमंतच होत जाईल, अशी चर्चा सुशिक्षित बेरोजगार करीत आहेत. शिकून पदव्या घेऊन गुणवत्तेला कुणीच विचारत नसून ‘पैसा बोलता है’ हा प्रकार असल्यामुळे आपला वाली ‘स्पर्धा परीक्षा’ असल्याची भावना मनाशी बाळगून विद्यार्थी स्पर्दा परीक्षेकडे वळत आहेत. (तालुका प्रतिनिधी)