७२ तासांत ६० हजारांवर शेतकऱ्यांचे तक्रार अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 06:00 AM2019-11-02T06:00:00+5:302019-11-02T06:00:13+5:30
वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला असेल तर अशा शेतकऱ्यांना ७२ तासात कृषी विभाग, मंडळ अधिकारी, तलाठी अथवा विमा कंपनीकडे तक्रार अर्ज दाखल करायचा होता. विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी त्याबाबतचा आदेशही काढला होता.
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : क्यार वादळानंतर बरसलेल्या परतीच्या पावसाने राज्यभरात लाखो हेक्टरचे नुकसान झाले. जिल्ह्यात एक लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात भरून न निघणारी हानी झाली आहे. या शेतकऱ्यांनी भरपाईसाठी ७२ तासांच्या आत अर्ज सादर करण्याचे आदेश विमा कंपनीने काढले. जिल्ह्यात अशा तक्रारी दाखल करणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा ६० हजारांवर पोहोचला आहे. गुरूवारच्या वादळी पावसाने हा आकडा लाखावर पोहोचण्याचा अंदाज आहे. तर सूचना न मिळाल्याने अनेक शेतकºयांना तक्रार अर्जच दाखल करता आले नाहीत. हे शेतकरी आता तालुका कार्यालयात धडकत आहेत.
वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला असेल तर अशा शेतकऱ्यांना ७२ तासात कृषी विभाग, मंडळ अधिकारी, तलाठी अथवा विमा कंपनीकडे तक्रार अर्ज दाखल करायचा होता. विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी त्याबाबतचा आदेशही काढला होता. हा आदेश धडकताच शेतकऱ्यांनी तक्रारीचे अर्ज कृषी विभागाकडे देण्यास सुरूवात केली आहे.
यातून तालुका कृषी कार्यालयात अर्ज देण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत. पंचनामे करण्यासाठी कुठलेही अधिकारी, कर्मचारी न पोहोचल्याने शेतकऱ्यांनीच आपले नुकसानीचे अर्ज कृषी विभागाकडे सादर केले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीची संख्या ६० हजारांवर पोहोचली आहे. त्यात गुरूवारी पुन्हा पाऊस बरसला. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या तक्रार अर्जाची संख्या लाखावर पोहोचण्याची शक्यता आहे.
उमरखेड तालुक्यातून ८५०० अर्ज दाखल झाले आहेत. महागाव तालुक्यातून ६४०० अर्ज आले आहेत. उमरखेड तालुक्यातून नऊ हजार अर्ज आले आहेत. दिग्रस तालुक्यातून ७००० हजार तक्रार अर्ज आले आहेत. आर्णी तालुक्यातून पाच हजार अर्ज दाखल झाले आहेत. दारव्हा तालुक्यात ३००० अर्ज आले आहेत. नेर तालुक्यात तक्रार दाखल करणाऱ्या अर्जांची संख्या तीन हजारांवर पोहोचली आहे. इतर तालुक्यातील अर्जांची छाननी केली जात आहे. एकूण ६० हजारांवर तक्रारी विमा कंपनीच्या प्रतिनिधींकडे सोपविण्यात आल्या आहेत.
नुकसान नियमांचा अवलंब होणार
विमा कंपनी नुकसान भरपाई देताना स्थानिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान या नियमानुसार भरपाई देणार आहे. ही रक्कम शेतकऱ्याने काढलेल्या विमा संरक्षित रकमेच्या काही टक्केच राहणार आहे. विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या अहवालानुसार काही रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर दुसरीकडे तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवकांच्या संयुक्त पंचनाम्याच्या अहवालानुसार शेकºयांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरविला नव्हता, अशा शेतकऱ्यांना ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले असेल तरच आपत्तीच्या नियमानुसार मदत मिळणार आहे. हे संयुक्त पंचनामे करताना विमा कंपनीच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
ऑनलाईन तक्रार नोंदविण्याची सोय
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना थेट ऑनलाईन तक्रार नोंदविता येणार आहे. त्याकरिता त्यांना नुकसानीचे फोटो काढून ऑनलाईन तक्रारीची नोंद करावी लागणार आहे. सोबत विमा पॉलिसीची पावती आॅनलाईन पाठविण्याच्या सूचना विमा कंपनीने दिल्या आहेत.