माजी मंत्री राठोड यांच्या विरोधातील 'ती' तक्रार माझी नव्हेच; महिलेचा एसआयटीपुढे जवाब

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 09:46 PM2021-08-21T21:46:56+5:302021-08-21T21:48:39+5:30

महिलेने माजी मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाची तक्रार केल्याचे सांगत, भाजपच्या चित्रा वाघ यांनी ती सचित्र समाज माध्यमांवर टाकली होती.

That complaint against former minister Sanjay Rathod is not mine; Woman's answer before SIT | माजी मंत्री राठोड यांच्या विरोधातील 'ती' तक्रार माझी नव्हेच; महिलेचा एसआयटीपुढे जवाब

माजी मंत्री राठोड यांच्या विरोधातील 'ती' तक्रार माझी नव्हेच; महिलेचा एसआयटीपुढे जवाब

Next

यवतमाळ : माजी मंत्री आमदार संजय राठोड यांच्या विरोधात पोस्टाने तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची विशेष समितीने चौकशी केली. ज्या महिलेच्या नावाने ती तक्रार होती, त्या महिलेने, आपण अशी कुठलीच तक्रार संजय राठोडांविरोधात केली नसल्याचे समितीपुढे म्हटले आहे. ही तक्रार कुणाचा तरी खोडसाळपणा असावा, अशी शक्यताही महिलेने जवाब नोंदवताना व्यक्त केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी ही माहिती शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. (That complaint against former minister Sanjay Rathod is not mine; Woman's answer before SIT)

महिलेने माजी मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाची तक्रार केल्याचे सांगत, भाजपच्या चित्रा वाघ यांनी ती सचित्र समाज माध्यमांवर टाकली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या तक्रारीची दखल घेवून पोलीस अधीक्षकांनी तत्काळ विशेष समिती स्थापन केली. अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे यांच्या समितीने तक्रारीत नाव असलेल्या महिलेचा १४ ऑगस्ट रोजी ईंन-कॅमेरा जवाब नोंदविले. घाटंजी पोलीस ठाण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याने हा जवाब घेतला. या महिलेसोबतच तिचे पती, तिचे वडील यांचाही जवाब विशेष चौकशी समितीने घेतला. त्यानंतर आमदार संजय राठोड यांचाही जवाब १९ ऑगस्ट रोजी चौकशी समितीने नोंदविला. यात राठोड यांनी तक्रार अर्जातून करण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याचे समितीला सांगितले. या घटनेत महिलेने तक्रार अर्जाशी आपला काहीही संबंध नसल्याचे चौकशी समितीला सांगितले. शिवाय या तक्रार अर्जात पतीचे नाव चुकीचे आहे. खोडसाळपणा करण्यासाठी कुणी तरी माझ्या नावाचा वापर केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

“पुरावे असतानाही कुणाच्या सांगण्यावरुन संजय राठोडांना बेड्या ठोकल्या नाहीत"

महिलेच्या या जवाबानंतर विशेष समितीने जिल्हा पोलीस अधीक्षक व घाटंजी पोलीस ठाण्यास प्राप्त झालेल्या दोन तक्रार अर्जाची थेट पोस्टात चौकशी केली. त्या अनुषंगाने घाटंजी डाक घर येथील पोस्टाचे अधिकारी-कर्मचारी यांचाही जवाब नोंदविला. त्यामध्ये १० ऑगस्ट रोजी सकाळी १०.२९ वाजता हे दोन्ही तक्रार अर्जाचे लिफाफे पंजीकृत झाल्याचे सांगण्यात आले. दोन अनोळखी पुरुषांनी हे लिफाफे आणल्याची माहिती पोस्टातील कर्मचाऱ्यांनी दिल्याचे पोलीस अधीक्षक भुजबळ यांनी सांगितले. 

दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तक्रार समाज माध्यमात व्हायरल करण्यापूर्वी किंवा त्यानंतर आजतागायत यवतमाळ पोलिसांशी कुठलाही संपर्क केला नसल्याची माहितीही भुजबळ यांनी दिली.
 

Web Title: That complaint against former minister Sanjay Rathod is not mine; Woman's answer before SIT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.