आढावा सभेत तक्रारींचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 10:24 PM2017-11-18T22:24:42+5:302017-11-18T22:25:09+5:30
गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शनिवारी पहिल्यांदाच वणी शहरात आढावा सभा घेतली.
आॅनलाईन लोकमत
वणी : गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शनिवारी पहिल्यांदाच वणी शहरात आढावा सभा घेतली. या सभेला जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह जिल्हास्तरावरील प्रमुख अधिकाऱ्यांनी हजेरी लावली. यावेळी तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडला. चार तास चाललेल्या या सभेला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
तक्रारींची संख्या लक्षात घेता शासनाच्या विविध विभागांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लाागले आहे. शनिवारी दुपारी १२ वाजता आढावा सभेला प्रारंभ झाला. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी दीपक सिंगला, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुळकर्णी, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, पंचायत समिती सभापती लिशा विधाते, उपसभापती संजय पिंपळशेंडे प्रामुख्याने उपस्थित होते. या आढावा सभेला तालुक्यातील अनेक गावातील सरपंच व नागरिकांनी हजेरी लावली. तसेच स्थानिक विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ना.अहीर यांनी विभागवार प्रगतीचा व तक्रारींचा आढावा घेतला. बहुतेक सरपंचांनी गावातील पाणी टंचाईचा विषय आढावा सभेत मांडला. यात वांजरी, गोवारी, नांदेपेरा, कुरई, शिंदोला, राजूर कॉलरी, कुंभारखणी, शिरपूर या गावांसह अनेक गावातील पाणी टंचाईची तिव्रता मंत्र्यांपुढे मांडली. शासनाने विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एक पोर्टल सुरू केले असल्याची माहिती दीपक सिंगला यांनी यावेळी दिली. वणी तालुक्यातील एसीसी कंपनी व वेकोलिकडून प्रकल्पग्रस्त शेतकरी व गावकºयांना होत असलेल्या त्रासाचा पाढाच नागरिकांनी वाचला. त्यावर संबंधित गावचे सरपंच व एसीसी, वेकोलिचे अधिकारी यांची उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी बैठक घेऊन समस्या निकाली काढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज देण्यासाठी बँक टाळाटाळ करीत असल्याची बाब पुढे आली. त्यावर बँकेच्या अधिकाऱ्यांना ना.अहीरांनी चांगलेच खडसावले.
राजूर कॉलरी येथील पाणी पुरवठा योजनेत अपहार होत असल्याची तक्रार सरपंचांनी केली. याची चौकशी करण्याचे आदेश वेकोलि अधिकाऱ्यांना देण्यात आले. अनेक गावातील सरपंचांनी अवैध दारू विक्री होत असल्याची तक्रार केली. त्यावर दारू विक्री करणाऱ्यांचे तडीपारीचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश अहीर यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले.
राजेश कुळकर्णी यांनी उज्वला योजना, पंतप्रधान आवास योजना, दिनदयाल उपाध्याय कौशल्य विकास योजनांबाबत माहिती दिली. बीटी बियाणे फसवणुकीच्या तक्रारी दाखल करण्यासाठी कृषी अधिकारी अकारण बियाणांचे वेष्टन मागत असल्याच्या तक्रारी शेतकºयांनी केल्या. त्यावर ना.अहीरांनी कृषी अधिकाऱ्यांना शासनाचे परीपत्रकच दाखविले व केवळ बिलाच्या आधारे तक्रारी घेण्याच्या सूचना केल्या. या बैठकीत वीज वितरण कंपनी, एस.टी. महामंडळ, बांधकाम विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभागातील समस्यांचाही आढावा घेण्यात आला.