यवतमाळातील जैवविविधता उद्यानाचे काम २६ जानेवारीपर्यंत पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 10:10 PM2018-11-29T22:10:53+5:302018-11-29T22:11:22+5:30
येथील जांब रोडस्थित जैवविविधता उद्यानाचे काम २६ जानेवारी २०१९ पर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. बुधवारी यासंबंधी मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील जांब रोडस्थित जैवविविधता उद्यानाचे काम २६ जानेवारी २०१९ पर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. बुधवारी यासंबंधी मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
या उद्यानासाठी ७ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यातून करण्यात आलेल्या कामांचाही वनमंत्र्यांनी आढावा घेतला. यात २१ कामे प्रस्तावित होती. त्यापैकी ५ कोटी ७१ लाख रुपयांची १३ कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
या कामाला आणखी वेग देण्यात यावा. यासंबंधीच्या कामाचे वेळापत्रक निश्चित करावे. त्याप्रमाणे उद्यानाची सर्व कामे वेळेत म्हणजे २६ जानेवारी २०१९ पूर्वी पूर्ण करावित. याबरोबरच आॅक्सिजन पार्कचे कामही गतीने पूर्ण करावे, असेही ना. मुनगंटीवार म्हणाले. या कामात लोकांना सहभागी करून घेऊन त्यांच्या चांगल्या सूचना अंमलात आणाव्यात, असे त्यांनी सांगितले.
या दोन्ही ठिकाणी शाळांच्या सहली आयोजित केल्या जाव्यात, शालेय विद्यार्थ्यांनाही जैवविविधता उद्यान आणि आॅक्सिजन पार्कमधील झाडांचे महत्त्व समजावून सांगितले जावे. त्यातून महसूल मिळवण्याचा प्रयत्न केला जावा. हत्तीखान्यातील जागेसंबंधी वन विभागाने अभ्यास करून निर्णय घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. बैठकीस सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार, वन सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते.