जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 06:00 IST2020-01-30T06:00:00+5:302020-01-30T06:00:11+5:30
पहिली घटना मारवाडी चौकात घडली. दुकाने बंद करण्यासाठी आलेले आंदोलक व व्यापारी समोरासमोर उभे ठाकल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. यावेळी एका मिरची विक्रेत्याकडे दगड भिरकावून साहित्याची फेकाफेक केली गेली. त्यानंतर या व्यापारी व त्याच्या पत्नीने हाती मिरचीपूड घेऊन या आंदोलकांचा सामना केला.

जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात बुधवारी बहुजन क्रांती मोर्चाने भारत बंद पुकारला होता. या बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र यवतमाळात बंदला दोन घटनांनी गालबोट लागले.
पहिली घटना मारवाडी चौकात घडली. दुकाने बंद करण्यासाठी आलेले आंदोलक व व्यापारी समोरासमोर उभे ठाकल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. यावेळी एका मिरची विक्रेत्याकडे दगड भिरकावून साहित्याची फेकाफेक केली गेली. त्यानंतर या व्यापारी व त्याच्या पत्नीने हाती मिरचीपूड घेऊन या आंदोलकांचा सामना केला. उपस्थित पोलिसांनी या जमावापुढे बघ्याची भूमिका घेतल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप आहे. त्यानंतर व्यापाऱ्यांनी नियंत्रण कक्षाला फोन करून पोलीस बोलविले. शहरचे ठाणेदार धनंजय सायरे यांनी सहकाऱ्यांसह मारवाडी चौकात पोहोचून आंदोलकांना पिटाळून लावले. यावेळी बंदसमर्थक व विरोधक मोठ्या संख्येने तेथे जमले होते. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
गालबोट लागण्याची दुसरी घटना दुपारी ३ वाजताच्या सुमारास मेनलाईनमधील बाजारपेठेत घडली. नेहरू चौकात आंदोलक व व्यापारी यांच्यात घोषणाबाजीवरून तणाव वाढला. दुकाने बंद करण्यासाठी जबरदस्ती केली जात असल्याने बाचाबाची झाली. अखेर पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. पोलिसांनी लाठीचार्ज करताच जमाव पांगला. मात्र त्यानंतर काही वेळाने हा जमाव पुन्हा तेथे एकवटला. गांधी चौकातही दुकानासमोर बसलेल्यांना शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला. मात्र पोलीस कुमक मोठी असल्याने या आंदोलकांनी शहरातून पुढे शांततेने मार्च काढला. शहरातील बाजारपेठ बंद करीत आंदोलक संविधान चौकात पोहोचले. तेथे आंदोलकांना संबोधित करण्यात आले. आंदोलकांच्या हातातील घोषणापत्रांनी सर्वांचे लक्ष वेधले होते. बंद व मोर्चात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रशासनाला निवेदन देवून बंदच्या आंदोलनाची सांगता झाली. बंद दरम्यान अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. बसस्थानक चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष कुंदा तोडकर यांनी केले.
यवतमाळ शहरात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागात तालुकास्तरावर संमिश्र बंद राहिल्याचे वृत्त आहे. तालुका व उपविभागीय प्रशासनाला बंद समर्थकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
महानिरीक्षकांची माहिती
आपल्या दुकानावर चालून आलेल्या आंदोलकांपासून बचाव करण्यासाठी हाती मिरचीपूड घेत त्यांना पिटाळून लावणाऱ्या रणरागिनी लिलाबाई रेकवार यांचा सत्कार करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. घटनेच्यावेळी पोलिसांची संख्या तेथे नगन्य होती. पोलिसांनाही न जुमाणणाऱ्या या आंदोलकांना लिलाबाईने त्यांच्यावर मिरचीपूड फेकत त्यांना पिटाळून लावले. त्यांच्या या धाडसाचे पोलिसांकडून कौतुक केले जात आहे.