बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 09:59 PM2018-09-10T21:59:28+5:302018-09-10T21:59:47+5:30
इंधन दरवाढीमुळे सर्वसामांन्याचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे सरकारने तत्काळ पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणावे या मागणीसाठी विरोधी पक्षांनी सोमवारी ‘भारत बंद’ची हाक दिली होती. या बंदला यवतमाळ शहरासह जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : इंधन दरवाढीमुळे सर्वसामांन्याचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे सरकारने तत्काळ पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणावे या मागणीसाठी विरोधी पक्षांनी सोमवारी ‘भारत बंद’ची हाक दिली होती. या बंदला यवतमाळ शहरासह जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.
सोमवारी स्थानिक बसस्थानक चौकातून निषेध रॅली काढण्यात आली. दुपारी विश्रामगृहातून निषेध मोर्चा काढण्यात आला. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, शेकाप, डावे पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी, पिपल्स रिपब्लिकन पार्टी, कवाडे गट, राजेंद्र गवई गट आदी मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्यांनी ‘मोदी हटाव देश बचाव’, ‘शेतकरी विरोधी नरेंद्र मोदी’ असे नारे दिले. त्यानंतर सामूहिकरित्या निवेदन सादर केले. बंदमुळे खासगी वाहतुकीवर परिणाम जाणवला. तर सराफा बाजार पूर्णत: बंद होता.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वॉजा बेग, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी मंत्री वसंतराव पुरके, माजी आमदार विजयाताई धोटे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबासाहेब गाडे पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष चंद्रशेखर चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा क्रांती राऊत, अनिल गायकवाड, उत्तम गुल्हाने, सिकंदर शहा, प्रमोद तिवारी, मूर्ती सहारे, सतीश मानधना, कौस्तुभ शिर्के, अजय चौपाने, आसिफ अली, कय्यूम खान, वीणा नागदिवे, कृष्णा पुसनाके, सुरेश गरूड, देवीदास चौरे आदी उपस्थित होते.
पेट्रोल दरवाढीतून सामान्यांची लूट
२०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ११० डॉलर प्रती बॅरल होत्या. तेव्हा मुंबईसह महाराष्ट्रात पेट्रोलचे दर ८० रूपये होते. तर डिझेलचे दर ६४ रूपये लिटर होते. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ८० डॉलर प्रती बॅरल आहेत. २०१४ तुलनेत हे दर ३० डॉलरने कमी आहेत. तरीही मुंबईसह राज्यात पेट्रोलचे दर ८७ रूपये आहेत. तर डिझेलचे दर ७६ रूपये ९६ पैसे आहेत. त्यातून सर्वसामान्यांची लूट होत आहे. सरकारने ही लूट थांबवावी, अशी मागणी मोर्चेकºयांनी केली. यावेळी मोदी सरकारविरुद्ध प्रचंड नारेबाजी करण्यात आली.