वणी तालुक्यात भाजपा-सेनेला संमिश्र यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 10:03 PM2017-10-09T22:03:20+5:302017-10-09T22:03:32+5:30

वणी तालुक्यातील १९ ग्रामपंचायतीची मतमोजणी सोमवारी १२ वाजता पूर्ण होऊन निकाल जाहीर झाले. निकालात सेना-भाजपाला संमिश्र यश मिळाले.

Composite success of BJP-Sena in Vani Taluka | वणी तालुक्यात भाजपा-सेनेला संमिश्र यश

वणी तालुक्यात भाजपा-सेनेला संमिश्र यश

Next
ठळक मुद्देशिंदोलात ‘गड आला, पण सिंह गेला’: चिखलगावात १४ जागांवर शिवसेनेचा विजय, गणेशपुरात बहुमत

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : वणी तालुक्यातील १९ ग्रामपंचायतीची मतमोजणी सोमवारी १२ वाजता पूर्ण होऊन निकाल जाहीर झाले. निकालात सेना-भाजपाला संमिश्र यश मिळाले. शिंदोला येथे शिवसेनेचे संजय निखाडे यांच्या पॅनलचे नऊपैकी सहा उमेदवार निवडून आलेत. मात्र सरपंचपदाचा उमेदवार पराभूत झाल्याने तेथे ‘गड आला पण सिंह गेला’ अशी स्थिती झाली. असे असले तरी बहुमत सेनेकडे असल्याने उपसरपंच हा सेनेचा असणार आहे. सर्वांचे लक्ष लागून असलेल्या चिखलगाव ग्रामपंचायतीवर १७ पैकी १४ सदस्य, तसेच सरपंचपदावर विजय मिळवून शिवसेनेचे सरपंच सुनिल कातकडे यांनी पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले. शहरालगतची गणेशपूर ग्रामपंचायत सेनेने आपल्या ताब्यात घेतली आहे. सेनेचे तेजराज बोढे हे सरपंच म्हणून ७० मतांनी निवडून आले आहेत.
तालुक्यातील ग्रामपंचायतीवर आपआपला झेंडा रोवण्यासाठी सेने व भाजपाने शक्ती पणाला लावली होती. केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, आ.संजीवरेड्डी बोदकुरवार यांनीही प्रचारात सहभाग घेतला होता. सेनेतर्फे जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार विश्वास नांदेकर, सुनिल कातकडे, उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे, तालुका प्रमुख गणपत लेडांगे यांनीही प्रचंड मेहनत घेतली. ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर होत नसल्या तरी पक्षाच्या समर्थनाने कार्यकर्ते निवडणुकीत स्वत:ला झोकून घेतात. सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या निकालात रांगणा, कळमना, कुरई, कायर, चारगाव, शिंदोला, बोर्डा व वरझडी या आठ ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात आल्याचा दावा आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केला आहे, तर चिखलगाव, गणेशपूर, वेळाबाई, पुरड (नेरड), साखरा (दरा), केसुर्ली, अहेरी, रांगणा, वरझडी, ब्राम्हणी या दहा ग्रामपंचायती सेनेच्या ताब्यात आल्याचा दावा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी केला आहे.
मेंढोली व मंदर ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. अनेक ग्रामपंचायतीमध्ये सरपंच एका पॅनलचा तर बहुमत दुसºया पॅनलचे अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे थेट निवडून आलेल्या सरपंचांना भविष्यात ग्रामपंचायतीचा कारभार चालविणे जिकरीचे होणार आहे. सोमवारी १२ वाजता निकाल जाहीर होताच, उमेदवारांनी जल्लोष करून विजयी मिरवणुका काढल्या.

वणी तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच
रांगणा - रंजना प्रकाश बोबडे, चिखलगाव - अनिल मारोतराव पेंदोर, ब्राम्हणी - उज्वला नागेश काकडे, अहेरी - ताईबाई नानाजी कुत्तरमारे, मंदर - देवराव मारोती देऊळकर, केसुर्ली - मंगला नामदेव टोंगे, चारगाव - सपना सचिन नावडे, वारगाव - कैलास आत्माराम धांडे, वरझडी- विठ्ठल दुर्गाजी बोढाले, मेंढोली - पवन शामराव एकरे, वेळाबाई - प्रभूदास गीरीधर नगराळे, शिंदोला - विठ्ठल बोंडे, कळमना - शांतराम महादेव राजूरकर, कुरई - अर्चना येरगुडे, पुरड (ने.) - सीमा विलास आवारी, कायर - नितीन सुधाकर दखणे, साखरा (दरा) - रवींद्र मोहनदास ठाकरे, गणेशपूर - तेजराज बोढे, बोर्डा - प्रवीण मडावी.

मारेगाव तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच
वेगाव - माला रामकृष्ण गौरकार, नवरगाव - सुनीता रामदास सोनुले, कोसारा - पांडुरंग नानाजी नन्नावरे, मार्डी - रवीराज परसराम चंदनखेडे, शिवणी (धोबे) - शशीकला जगदीश काटवले, कानडा - मनिषा पवन ढवस, वनोजादेवी - गीता सुधाकर धांडे, गौराळा - संजीवनी घनश्याम रोगे, हिवरी - नंदकुमार बोबडे (अविरोध).

झरीत दोन ग्रामपंचायती काँग्रेसकडे, तर एक भाजपाकडे
झरी - तालुक्यात झालेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सतपल्ली व टाकळीच्या सर्व जागा कॉंग्रेसला राखता आल्या, तर दुर्भा ग्रामपंचायतीवर भाजपाने आपले वर्चस्व सिद्ध केले. टाकळी येथे सरपंच म्हणून लक्ष्मण बुरेर्वार, तर सदस्य म्हणून लक्ष्मीकांता गोपेवार, मीराबाई दुधबावणे, वसंतराव राडेवार, शिला पेंदोर, रमेश रोडावार ,वसंता गेडाम,पुष्पा गोपेवार विजयी ठरले. सतपल्ली येथे सरपंचपदी शंकर सिडाम, तर सदस्यपदी हनमंतु बोलीवार, लीना चंदावार, गजानन राजपवार, शशिकला धोटे, सुनिल शिंणमवार, गिता लक्षट्टीवर ,मंगला मौजे, निवडून आल्या, तर दुर्भा येथे सरपंचपदी सतीश नाखले तर सदस्य म्हणून मंगल मेश्राम, कौशल्याबई जगनाडे, सुरेश नल्लावार, पंचफुला ढोके, बालाजी सिडाम, लसुमदेवी मार्चट्टीवार, वर्षा भेंदोडकार निवडून आल्या. वठोली ग्रामपंचायत अविरोध झाली असून सरपंचपदी लता केमेकार निवडून आल्या.

Web Title: Composite success of BJP-Sena in Vani Taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.