कर्जदारांसह जमानतदारांकडून सक्तीची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2022 09:45 PM2022-11-16T21:45:52+5:302022-11-16T21:46:47+5:30

यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, अमरावती आणि नांदेडमध्ये महिला बँकेच्या १९ शाखा आहेत, त्यातील १५ शाखा  यवतमाळ जिल्ह्यात आहेत. पाच जिल्ह्यात असलेल्या शाखांमध्ये ३६ हजार ५६० ठेवीदारांचे १८५ कोटी रुपये अडकले आहेत. तर दुसरीकडे १ हजार १३ कर्जदारांनी बँकेकडून २६७ कोटी रुपयांच्या कर्जाची उचल केली आहे. या मूळ कर्जावर २०८ कोटी रुपयांचे व्याज झाले आहे. कर्जदारांनी थकीत कर्जाची परतफेड केली नाही.

Compulsory recovery from debtors including sureties | कर्जदारांसह जमानतदारांकडून सक्तीची वसुली

कर्जदारांसह जमानतदारांकडून सक्तीची वसुली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बाबाजी दाते महिला बँकेचाबँकिंंग परवाना आरबीआयने रद्द केला आहे. यानंतर या ठिकाणी अवसायकाची नियुक्ती करण्यात आली आहे. पदभार स्वीकारताच अवसायक नानासाहेब चव्हाण यांनी  कर्जदारांच्या सक्तीच्या वसुलीचे  आदेश काढले आहेत. थकीत कर्जदारासह जमानतदाराकडून ४७५ कोटी रुपयांची कर्ज वसुली होणार आहे. याशिवाय ज्या खातेधारकांचे लाॅकर असेल अशांनी ते बंद करावे, असे आवाहन अवसायकांनी केले आहे.
यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, अमरावती आणि नांदेडमध्ये महिला बँकेच्या १९ शाखा आहेत, त्यातील १५ शाखा  यवतमाळ जिल्ह्यात आहेत. पाच जिल्ह्यात असलेल्या शाखांमध्ये ३६ हजार ५६० ठेवीदारांचे १८५ कोटी रुपये अडकले आहेत. तर दुसरीकडे १ हजार १३ कर्जदारांनी बँकेकडून २६७ कोटी रुपयांच्या कर्जाची उचल केली आहे. या मूळ कर्जावर २०८ कोटी रुपयांचे व्याज झाले आहे. कर्जदारांनी थकीत कर्जाची परतफेड केली नाही. यातून व्याज वाढले. बँकेचा एनपीएदेखील वाढत गेला. सध्याच्या स्थितीत मूळ कर्जासह व्याजाचे रक्कम धरून ४७५ कोटी रुपये १ हजार १३ कर्जदार सभासदांकडून बँकेला वसूल करायचे आहेत. 
यानंतरच ठेवीदारांचे १८५ कोटी रुपये परत करता येतील. त्यामुळे अवसायक चव्हाण यांनी थकीत कर्जदारांकडून सक्तीची कर्ज वसुली करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यापूर्वी डीआयसीजीसीच्या माध्यमातून पाच लाखांच्या आतील २९४ कोटी रुपये परत केले आहेत. अजूनही १८५ कोटी रुपये परत करायचे आहेत. अनेक सभासदांना बँकेच्या सध्याच्या स्थितीची माहितीच नाही. त्यामुळे अशा सभासदांना क्लेम परत मिळण्यासाठी पुन्हा अर्ज करता येणार आहे. बँक ठेवीदारांचे पैसे मिळालेल्या वसुलीतून परत करणार आहे. यामुळे वसुली मोहीम महत्वाची आहे. 

एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंतच्या व्यवहाराचे होणार ऑडिट
- अवसायकांनी पदभार स्वीकारल्यानंतर १ एप्रिल २०२२ ते ११ नोव्हेंबरपर्यंत पार पडलेल्या व्यवहाराच्या संपूर्ण कामकाजाचे ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे या काळात नेमके काय घडले, ही बाबदेखील समोर येणार आहे. 
‘डीआयसीजीसी’ला २८७ कोटी परत करावे लागणार 
- सभासदांच्या ठेवीला सुरक्षा प्रदान करण्यासाठी विमा उतरविला जातो. त्यासाठी डीआयसीजीसीला या रकमेसाठी २८७ कोटी रुपये द्यायचे आहे. त्यातील सात कोटी रुपये परत करण्यात आले आहेत. मात्र, इतर रक्कम अजूनही परत व्हायची आहे. 

१९ शाखांमधील कर्मचारी टप्प्याटप्प्याने कमी होणार 
- पाच जिल्ह्यांतील १९ शाखांमध्ये २०३ कायमस्वरूपी कर्मचारी आहेत. तर १२ अस्थायी स्वरुपाचे कर्मचारी आहेत. बँकेचा बँकिंग परवाना रद्द झाल्याने बँकेचा आर्थिक बोझा कमी करण्यासाठी कर्मचारी कपात केली जाणार आहे. त्यासाठी टप्प्याटप्प्याने पाचही जिल्ह्यांत मोहीम राबविली जाणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर पुढील काळात गदा येणार आहे. 

चार मालमत्ता आणि चलअचल संपत्तीवर टाच
- महिला बँकेच्या चार स्वत:च्या मालमत्ता आहेत. याशिवाय वाहनदेखील आहे. या सर्व मालमत्तांवरदेखील टाच येणार आहे. यामुळे भविष्यात कर्जवसुलीसह या मालमत्तांच्या एकूण संपत्तीची विल्हेवाट करावी लागणार आहे. 
- लाॅकरधारकाकडे थकीत कर्ज असल्यास कर्जाच्या रकमेचा भरणा करून लाॅकर बंद करता येणार आहे. कर्ज नसेल तर १५ डिसेंबरच्या आत लाॅकरचे भाडे भरुन लाॅकर बंद करता येणार आहे. 

थकीत कर्जदारांनी बॅंकेची थकलेली रक्कम तत्काळ अदा करावी. यामुळे ठेवीदारांचे पैसे परत करण्यास मोलाचा हातभार लागेल. त्या दृष्टीने वसुली मोहीम सुरू केली आहे. अवसायकाचा कालावधी १५ वर्षांचा आहे. या कालावधीमध्ये ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासोबतच त्यांचे पैसे परत करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी सक्तीच्या वसुलीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. 
- नानासाहेब चव्हाण
अवसायक, 
बाबाजी दाते महिला बँक

 

Web Title: Compulsory recovery from debtors including sureties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.