स्त्री रुग्णालयासाठी ग्रीन बिल्डिंग संकल्पना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 12:04 AM2018-10-03T00:04:03+5:302018-10-03T00:04:41+5:30
स्थानिक वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयात २८८ खाटांचे स्वतंत्र स्त्री रुग्णालय साकारले जात आहे. या इमारतीच्या बांधकामालाही सुरुवात झाली आहे. मात्र आता बांधकाम विभागाने ग्रीन बिल्डींग संकल्पनेतून ही इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्थानिक वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयात २८८ खाटांचे स्वतंत्र स्त्री रुग्णालय साकारले जात आहे. या इमारतीच्या बांधकामालाही सुरुवात झाली आहे. मात्र आता बांधकाम विभागाने ग्रीन बिल्डींग संकल्पनेतून ही इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ग्रीहा पुणे येथील संस्था तांत्रिक मार्गदर्शन करणार आहे.
१७ कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी बांधकाम विभागाने नव्याने निविदा प्रक्रिया बोलविली आहे. इमारतीमध्ये निसर्गाची समृद्धी उन्ह, वारा, पाऊस खेळता राहावा यावर भर दिला जाणार आहे. शासनाने २०१७ मध्ये ग्रीन बिल्डींग संकल्पनेच्या अंमलबजावणीचे आदेश दिले आहे. प्रत्येक शासकीय इमारत बांधताना आता आर्किटेक्चर करून नव्या संकल्पनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यासाठी मूळ आराखड्यात काही जुजबी फेरबदल केले जाणार आहे. एक आदर्श इमारत निर्माण करण्यासाठी आर्किटेक्चरकडून आराखडा मागविला आहे. शासकीय कार्यालय, रुग्णालय इमारती कोंदट असतात. अनेक भागात तर रात्रंदिवस लाईट सुरू ठेवावे लागतात. विशेष करून रुग्णालयांमध्ये भरपूर हवा व प्रकाश नसल्याने स्वच्छतेचा प्रश्न उद्भवतो. या सर्व चुका टाळून इमारत बांधकाम केले जात असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपल्लीकर यांनी सांगितले.
पुण्याची संस्था करणार प्रमाणित
रुग्णालयाची इमारत असल्याने येथे वॉश बेसीनपासून प्रत्येक बारीक सारिक गोष्टींचा नव्याने विचार करून आराखडा तयार केला जात आहे. आयसीसीयु, हार्ट केअर, शस्त्रक्रियागृह, वार्ड, बेबी वार्ड अशा अनेक बाबींचा स्वतंत्रपणे विचार करून आराखडा तयार केला जात आहे.
पुणे येथील ग्रिहा या संस्थेकडून ग्रीन बिल्डींगबाबत सर्टिफिकेशन केले जाणार आहे.