शिक्षक पात्रता परीक्षेत ईडब्ल्यूएस उमदेवारांनाही सवलत; महाराष्ट्र ठरले पहिले राज्य
By अविनाश साबापुरे | Published: June 10, 2023 06:04 PM2023-06-10T18:04:19+5:302023-06-10T18:04:49+5:30
टीईटी, सीटीईटी परीक्षेत आर्थिक मागास विद्यार्थ्यांना दिलासा
यवतमाळ :शिक्षक म्हणून नोकरी मिळविण्यासाठी लाखो विद्यार्थी दरवर्षी टीईटी, सीटीईटी परीक्षा देत आहेत. या परीक्षेच्या काठिण्य पातळीमुळे अनेकांचा नंबर हुकत आहे. परंतु, आता अन्य मागास घटकातील विद्यार्थ्यांप्रमाणे आर्थिक दुर्बल घटकातील (ईडब्ल्यूएस) विद्यार्थ्यांनाही आता पात्रता गुणांमध्ये पाच टक्के गुणांची सूट लागू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ईडब्ल्यूएस उमेदवारांना अशी सवलत देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे. यासंदर्भात शुक्रवारी ९ जून रोजी शालेय शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्त, परीक्षा परिषदेचे आयुक्त आणि शिक्षण संचालकांना लेखी निर्देश दिले आहेत.
७ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या जीआरनुसार राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करण्यात आली आहे.
पहिली ते आठवीच्या शिक्षकांना टीईटी किंवा सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. या परीक्षेत सदर शासन निर्णयानुसार एसीसी, एसटी, ओबीसी, एसबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती-ब, भटक्या जमाती-क, भटक्या जमाती-ड, सामाजिक व शैक्षणिक मागास, खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटक, दिव्यांग उमेदवार आदींना पात्रता गुणांमध्ये पाच टक्के सूट देण्यात आली आहे. परंतु, या शासन निर्णयात टीईटी आणि सीटीईटी असा स्पष्ट उल्लेख नाही. त्यामुळे ईडब्ल्यूएस उमेदवारांना सीटीईटीमध्ये सवलत देण्याबाबत संभ्रम होता.
आता याबाबत स्पष्टता करणारे परिपत्रक शिक्षण विभागाने आयुक्त व संचालकांना शुक्रवारी दिले आहे. त्यानुसार आता राज्य शासन (टीईटी) आणि केंद्र शासनाद्वारे (सीटीईटी) आयोजित अशा दोन्ही शिक्षक पात्रता परीक्षेत ईडब्ल्यूएस उमेदवारांना पाच टक्के गुण सवलत लागू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सीटीईटीतील ८२ गुण म्हणजेच ५५ टक्केवरील आर्थिक दुर्बल घटक संवर्गातील विद्यार्थ्यांना पात्रतेमध्ये ५ टक्के गुणांची सूट देण्याबाबत डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशनने गेल्या दोन महिन्यांपासून पाठपुरवा केला होता.
ईडब्ल्यूएस उमेदवारांना राज्यात सीटीईटीमध्ये पाच टक्के सूट मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू होता. त्याला यश आले. राज्यातील हजारो ईडब्ल्यूएस उमेदवारांना फायदा होणार आहे.
- संतोष मगर, संस्थापक अध्यक्ष, डीटीएड, बीएड स्टुडंट्स असोसिएशन