सवलतधारकांचा प्रवास, 'एसटी'ची दणक्यात कमाई
By विलास गावंडे | Published: June 21, 2024 10:07 PM2024-06-21T22:07:06+5:302024-06-21T22:07:21+5:30
नऊ कोटींवर लाभार्थी : महिनाभरात मिळाले ५४४ कोटींचे उत्पन्न
यवतमाळ : तिकिटात सवलतीचा लाभ घेत महिनाभरात ९ कोटी २४ लाख २३ हजार ३१४ नागरिकांनी लालपरीतून प्रवास केला. या माध्यमातून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ५४४ कोटी ४३ लाख ८७ हजार २९५ रुपये एवढे उत्पन्न मिळाले आहे. उन्हाळ्यातील सुट्या आणि लग्नसराईमुळे मे महिन्यात सवलतधारक प्रवाशांची संख्या वाढीचा फायदा महामंडळाला मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाद्वारे विविध सामाजिक घटकांना सवलतीत प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, पुरस्कारार्थी, रुग्ण आदी ३३ घटकांचा यामध्ये समावेश आहे. महिलांना महिला सन्मान योजनेअंतर्गत, तर ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक सवलत योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या बसेसमध्ये प्रवासात ५० टक्के सवलत देण्यात आलेली आहे. अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत वयाची पंचाहत्तरी गाठलेल्या नागरिकांना मोफत प्रवास आहे. विद्यार्थी, विद्यार्थिनींसाठी प्रवास सवलतीची वेगवेगळी टक्केवारी आहे. शिवाय काही योजनांतर्गत शंभर टक्के मोफत प्रवास आहे.
या योजनांचा लाभ घेणारे प्रवासी नियमित असले, तरी उन्हाळ्याच्या सुट्या आणि लग्नसराईत ही संख्या वाढत असल्याचे दिसून येते. एप्रिल २०२४मध्ये सर्व प्रकारच्या सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या ८ कोटी ७९ लाख ६० हजार ६८९ एवढी होती. मे २०२४मध्ये ती ९ कोटी २४ लाख २३ हजार ३१४ एवढी झाली होती. एप्रिलमध्ये काही दिवस शाळा, महाविद्यालये सुरू होती. यावरून मे महिन्यात लग्नसराई आणि उन्हाळी सुट्यांमध्ये सवलतीत प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे, हे स्पष्ट होते.
उत्पन्नातही झाली वाढ
सवलतीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून महामंडळाला एप्रिल २०२४ मध्ये ५२२ कोटी ७५ लाख ४ हजार ३४२ रुपये एवढी कमाई झाली होती. मे महिन्यात ५४४ कोटी ४३ लाख ८७ हजार ३९५ रुपये एवढे उत्पन्न मिळाले. विशेष म्हणजे शाळा, महाविद्यालयांना मे महिन्यात सुट्या होत्या.
३४१ कोटींची उधारी
सवलतीच्या रकमेची प्रतिपूर्ती शासनाकडून महामंडळाला केली जाते. अर्थातच शासनाकडे ही उधारी असते. महिलांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात येते. १०० रुपये तिकीट असल्यास एसटी तत्काळ ५० रुपये वसूल करते. उर्वरित ५० रुपये शासनाकडून मिळतात. अशा प्रकारे मे महिन्याचे ३४१ कोटी ३५ लाख ८४ हजार १७५ हजार रुपये शासनाकडे उधार आहेत.
महिना - लाभार्थी - प्रवासभाडे - वसूल रक्कम - शासनाकडून घेणे
एप्रिल - ८,७९,६०,६८९ - ५,२२,७५,०४,३४२ - १,८८,८९,३६,२११ - ३,३३,८५,६८,१३२
मे - ९,२४,२३,३१४ - ५,४४,४३,८७,२९५ - २,०३,०८,०३,१२० - ३,४१,३५,८४,१७५