९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 08:47 PM2019-01-13T20:47:54+5:302019-01-13T20:48:16+5:30

साहित्य संमेलनांतून लोकशिक्षण, लोकप्रबोधन आणि लोकसंस्कार होतात. तेच या संमेलनातही झाले, असे प्रतिपादन केंद्रीय सडक परिवहन व नदी विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

The concluding of the 92nd All India Marathi Sahitya Sammelan | ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप

९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप

Next
ठळक मुद्देविचारभिन्नतेपेक्षा विचारशून्यता ही मोठी समस्या; नितीन गडकरी;

अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : विचार भिन्न असू शकतात. विचारभिन्नता ही समस्याच नाही. त्यापेक्षा विचारशून्यता ही मोठी समस्या आहे. आपल्या देश ज्या संरचनेवर उभा आहे, ज्या विचारांवर उभा आहे, ते अत्यंत दूरगामी परिणाम देणारे आहे. महाराष्ट्राची संस्कृती, मराठी साहित्य, महाराष्ट्राचे मराठीपण किती मोठे आहे, हे महाराष्ट्राबाहेर गेल्यावर कळते. साहित्य संमेलनांतून लोकशिक्षण, लोकप्रबोधन आणि लोकसंस्कार होतात. तेच या संमेलनातही झाले, असे प्रतिपादन केंद्रीय सडक परिवहन व नदी विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा रविवारी सायंकाळी येथे समारोप झाला. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ना. गडकरी बोलत होते. ते म्हणाले, सामाजिक जागृती करण्याचे काम साहित्य करीत असते. सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा हे सर्व खोटं आहे. जीवन आनंदाने जगण्यासाठी विचारांची प्रेरणा लागते. विचारांतूनच व्यक्तिमत्त्व परिपक्व आणि भारदस्त होते. भारतीय समाजाला अशी परिपक्वता, प्रगल्भता दिली ती साहित्यानेच.
चांगूलपणावर कुठेही ‘पेटेंट’ होत नाही. चांगूलपणाची ‘कॉपी’ करणे वाईट नाही. कारण चांगूलपणावर कोणाचीही ‘मोनोपली’ नाही. ज्यांना आपण फार मोठे समजतो, त्यांच्या जवळ गेल्यावर ते फार छोटे असल्यचे कळते. तर ज्यांना आपण लहान समजतो, त्यांच्या जवळ गेल्यावर कळते की ते किती मोठे आहे. वैशालीताई येडे यांना उद्घाटक म्हणून बोलावून आयोजकांनी महत्त्वपूर्ण काम केले. त्यांनी भलेही पुस्तक लिहिले नसेल. पण स्वत:च्या संघर्षातून जीवन कसे जगावे याचे उदाहरण त्यांनी आपल्यापुढे ठेवले आहे, अशा शब्दात ना. नितीन गडकरी यांनी आयोजकांना दाद दिली.

- पटलं तरच मत द्या
ना. गडकरी म्हणाले, राजकारणाचा अर्थ सत्ताकारण नाही. राष्ट्रनीती, लोकनीती हा राजकारणाचा भावार्थ समजावून सांगण्याची गरज आहे. म्हणूनच मी नेहमी लोकांना म्हणत असतो, पटलं तरच मला मत द्या, नाही पटलं तर नका देऊ . राजकारण्यांची साहित्य किंवा इतर क्षेत्रात हस्तक्षेप करू नये. पण म्हणून त्यांचे संबंधच असू नये हे बरोबर नाही. साहित्यिक आणि राजकारणी यांच्यात सहकार्य व संवाद असला पाहिजे. जातीवाद, धर्मांधता या आजच्या समाजाच्या समस्या आहेत. पण माणूस केवळ त्याच्या गुणाने श्रेष्ठ ठरतो, हे लक्षात ठेवले पाहिजे. सत्ताधाऱ्यांना वळण लावण्यासाठी सामाजिक दंडशक्ती निर्माण झाली पाहिजे. ही शक्ती साहित्यिक व पत्रकारांतूनच निर्माण होईल.

संमेलनांमुळे मराठीचे वैभव वाढते- अहीर
केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, संमेलनांमुळे मराठीचे वैभव वाढत आहे. शंभरीकडे निघालेले यवतमाळचे ९२ वे संमेलन साहित्य जगतासाठी अत्यंत महत्त्वाचे होते. या संमेलनाला यवतमाळकरांनी व सर्वच ठिकाणांहून आलेल्या रसिकांनी जी हजेरी लावली, त्यावरून साहित्याचे महत्त्व लक्षात येते.

रसिकांचा आत्मविश्वास वाढला- कुलगुरू
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू म्हणाले, या संमेलनाच्या यशस्वीतेमुळे विदर्भातील रसिकांचा आत्मविश्वास वाढला आहे. भारताचे संविधान अमलात येण्यापूर्वीच या देशाला राष्ट्रीय भाषा मिळाली. यावरुन मानवी जीवनातील भाषेचे महत्त्व लक्षात येते. १४० वर्षांपूर्वी पहिले साहित्य संमेलन झाले होते. पण १४० वर्षानंतर मराठीचा व्यवहारात वापर करा म्हणून शासनाला परिपत्रक काढावे लागते, हे दुर्दैव आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री मदन येरावार यांनी आयोजनासाठी हातभार लावणाºयांचे यावेळी आभार मानले. विद्या देवधर यांनी अध्यक्ष या नात्याने साहित्य महामंडळाची बाजू मांडली. प्रास्ताविक कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांनी केले. तर सूत्रसंचालन कार्यवाह प्रा. घन:शाम दरणे यांनी केले.

प्रतिकूलतेने वाढविला प्रतिसाद : ढेरे
संमेलनातील भरगच्च उपस्थितीने माणसांचे अजूनही साहित्यावर प्रेम आहे, हे सिद्ध झाले. संमेलनावर बहिष्कारासारखे संकट आले होते. पण आपण एकत्र येण्याचा, संवादाचा हट्ट सोडला नाही. प्रतिकूलतेमुळेच या संमेलनाला अधिक प्रतिसाद मिळाला, अशी भावना यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केली. पैसे गोळा करणे सोपे असते, पण माणसं गोळा करणे महाकठीण. डॉ. रमाकांत कोलते या साध्या शिक्षकाने मात्र ही कामगिरी यशस्वी करून दाखविली. ग्रंथालयांच्या समस्या शासनाने तातडीने सोडवाव्या, अशी मागणीही संमेलनाध्यक्षांनी यावेळी नोंदविली.

Web Title: The concluding of the 92nd All India Marathi Sahitya Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.