उमरखेड ते ढाणकी रस्त्याचे काँक्रिटीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:44 AM2021-07-30T04:44:02+5:302021-07-30T04:44:02+5:30
उमरखेड : शहरातून ढाणकीकडे जाणारा रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे. मात्र, या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. त्याचे काँक्रिटीकरण करावे, ...
उमरखेड : शहरातून ढाणकीकडे जाणारा रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे. मात्र, या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. त्याचे काँक्रिटीकरण करावे, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने केली आहे.
या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरवर्षी रस्त्याच्या दुरुस्तीवर थातुरमातुर काम करून जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली जात आहे. हा रस्ता जवळपास ५० टक्के गावांना जोडतो. शहराबाहेर वाशिम अर्बन बँक, बाजार समिती, व्यापार संकुल, गो. सी. गावंडे महाविद्यालय, क्रीडा संकुल, शाळा, आयटीआय कॉलेज, एमआयडीसी या रस्त्याला जोडलेले आहे. शहरातून अनेक विद्यार्थी सायकल, दुचाकीने जातात. मात्र, खड्ड्यांमध्ये पाणी असल्यामुळे अनेकदा अपघात होतात.
आठवडी बाजारादिवशी रस्त्यावर मोठी वर्दळ असते. जनावरांचा बाजार या रस्त्यावर भरतो. त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. पावसाळ्यात पाण्याचा विसर्ग न झाल्याने अनेकदा रस्त्यावर कमरेएवढ्या पाण्यातून नागरिकांना रस्ता काढावा लागतो. या रस्त्याचे तातडीने काँक्रिटीकरण करावे, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. अन्यथा ११ ऑगस्टला खड्ड्यांत बसून ठिय्या व रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. निवेदन देताना तालुकाप्रमुख सय्यद माजीत, शहरप्रमुख राहुल मोहितवार, अंकुश पानपट्टे, गोपाल झाडे, विवेक जळके, प्रवीण इंगळे, शैलेश मेंढे, आकाश शिंदे, महेश ताकतोडे, अनिल वाघ, अवधूत खडककर, समाधान लष्कर, अथर खतीब आदी उपस्थित होते.