नागरिक व वनअधिकाऱ्यांत संघर्ष वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 09:38 PM2018-09-24T21:38:27+5:302018-09-24T21:39:00+5:30
नरभक्षक वाघिणीला ठार मारा, अशी मागणी सामान्य नागरिकांकडून होत असली तरी वन्यजीवप्रेमींचा मात्र याला तीव्र विरोध आहे. नेमका याच विषयावरून नागरिक व वनअधिकाºयांत संघर्ष वाढला आहे. अज्ूुन किती जणांचे बळी गेल्यानंतर नरभक्षक वाघिणीचा बंदोबस्त करणार, असा संतप्त सवाल आता कमालीच्या दहशतीखाली असलेले भयग्रस्त नागरिक विचारत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : नरभक्षक वाघिणीला ठार मारा, अशी मागणी सामान्य नागरिकांकडून होत असली तरी वन्यजीवप्रेमींचा मात्र याला तीव्र विरोध आहे. नेमका याच विषयावरून नागरिक व वनअधिकाºयांत संघर्ष वाढला आहे. अज्ूुन किती जणांचे बळी गेल्यानंतर नरभक्षक वाघिणीचा बंदोबस्त करणार, असा संतप्त सवाल आता कमालीच्या दहशतीखाली असलेले भयग्रस्त नागरिक विचारत आहेत.
हा संघर्ष लक्षात घेता, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशावरूनं प्रधान मुख्य वनसंरक्षक ए.के.मिश्रा हे शनिवारी सायंकाळी पांढरकवडात दाखल झाले असून त्यामुळे आता वाघिणीला जीवंत पकडण्याची अथवा ती बेशुद्ध न झाल्यास तिला ठार मारण्याची मोहिम वेगवान होण्याची चिन्हे आहेत. वन्यजीवप्रेमींसाठी वाघांचा जीव वाचविणे महत्त्वाचे असले तरी माणसांचा जीव वाचविणे महत्त्वाचे नाही काय, असा संतप्त प्रश्न विचारून दहशतीखाली असलेले शेतकरी, शेतमजूर वनअधिकाºयांना भांडावून सोडत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने नरभक्षी वाघिणीला बेशुद्ध करून पकडण्याचा किंवा ठार मारण्याचा निर्णय ४ सप्टेंबरला दिला. त्यामुळे वनखात्याने शार्पशुटर शहाफज अली खान याला आंध्रप्रदेशातून बोलाविले होते. वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने मोठा लवाजमा जंगलात लावला होता. वन्यजीवप्रेमींच्या विरोधाची दखल घेऊन केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री तथा वन्यजीवप्रेमी मनेका गांधी यांनी शार्प शुटर नवाबला जंगलातून परत पाठविण्याचे आदेश दिले. परिणामी मुक्कामाला असलेल्या नवाबने येथून परतीचा मार्ग धरला. या पार्श्वभूमीवर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक ए.के.मिश्रा यांचे मुख्यालय पांढरकवडा करून त्यांनी तेथेच राहून वाघीणीचा बंदोबस्त करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रधान मुख्य वनसंरक्षक मिश्रा हे शनिवारीच सायंकाळी पांढरकवडा येथे पोहोचले असून ते वाघिणीच्या वास्तव्याचे ठिकाण पाहण्याकरिता जंगलात गेल्याची माहिती सुत्राने दिली. त्याचे मुख्यालय उमरी राहणार असल्याची माहिती मिळाली.
कामासाठी भयग्रस्त
शेतमजुरांचे स्थलांतर
दरम्यान, ज्या गावातील शेतकरी-शेतमजुरांचे या नरभक्षक वाघीणीने बळी घेतला त्या बोराटी, खैरगाव, झोटींगधरा, तेजनी, जिरामिरा, सराटी, सखी, जिरा, विहिरगाव, लोणी, वेडशी या गावातील व आजुबाजूच्या परिसरातील गावात या नरभक्षक वाघीणीची एवढी दहशत आहे की, शेतात कोणीही जायला तयार नाही. शेतीची कामे पूर्णत: ठप्प पडली आहे. जीरा, मिरा, वाठोडा, तेजनी, सराटी, बोराटी या भागातील शेतकरी, शेतमजूर शेतातील कामे सोडून करंजी, रूंझा, मोहदा, राळेगाव येथे हमालीची व इतर मजुरीची कामे करताना दिसत आहे.
वाघापेक्षा माणसाचा जीव स्वस्त आहे का? -वासुदेव आत्राम
नरभक्षी वाघीण लागोपाठ माणसे मारत आहे. आतापर्यंत या वाघिणीने १४ शेतकरी, शेतमजुरांचा बळी घेतल्यानंतरही या वाघिणीचा बंदोबस्त होत नाही. सरकार याचा बंदोबस्त करत नाही. वाघापेक्षा माणसाचा जीव स्वस्त आहे का, असा संतप्त सवाल वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शंकर आत्राम यांचा भाऊ वासुदेव आत्राम यांनी ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला.
लोकांचा जीव जात असेल तर वन्यप्राणीही सुरक्षित नाहीत
वन्यप्राण्यांचे वन्यप्राण्यांकडूनच जर जीव जात असतील तर वन्यप्राणीदेखिल सुरक्षीत राहणार नाही. त्यामुळे नरभक्षक वाघिणीचा तातडीने बंदोबस्त करणे आवश्यक असल्याची प्रतिक्रीया वन्यजीवप्रेमी प्रा.रमजान विराणी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. पोलीस आणि वनखात्याकडे एक्सपर्ट शार्पशुटर असताना वादग्रस्त शार्पशुटरला पाठविण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती. मनुष्य-वन्यप्राणी संघर्ष वाढू नये, यासाठी प्रयत्न आवश्यक असल्याचे ते म्हणाले.