संगणक टंकलेखनमधील 'पुढील परीक्षेसाठी पात्र'ने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ; परीक्षा परिषदेकडून स्पष्टीकरणच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2022 12:57 PM2022-04-18T12:57:16+5:302022-04-18T13:12:19+5:30
राज्यभरातील अनेक विद्यार्थ्यांच्या बाबतीत 'इलिजिबल फॉर नेक्स्ट एक्झाम'चा प्रकार घडला आहे. यासाठी परीक्षा केंद्र असलेले इन्स्टिट्यूटच जबाबदार असल्याचा आरोप संगणक टायपिंग केंद्र संचालकांकडून केला जात आहे.
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने घेण्यात आलेल्या संगणक टंकलेखन परीक्षेतील निकालात झालेल्या घोळामुळे विद्यार्थी गोंधळून गेले आहेत. या परीक्षेच्या गुणपत्रिकेत रिझल्टच्या रकान्यात पास, नापास असा कुठलाही उल्लेख न करता 'इलिजिबल फॉर नेक्स्ट एक्झाम' अर्थात 'पुढील परीक्षेसाठी पात्र' एवढाच उल्लेख करण्यात आला आहे.
परिषदेच्या वतीने नोव्हेंबर २०२१ मध्ये शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात आली. इंग्रजी, मराठी, हिंदी ३० व ४० शब्द प्रति मिनिटाची ही परीक्षा राज्यातील एक लाख सात हजार ९६० विद्यार्थ्यांनी दिली. ठिकठिकाणच्या इन्स्टिट्यूटवर ही परीक्षा पार पडली. दोन दिवसांपूर्वी या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. गुणपत्रिका ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राज्यभरातील अनेक विद्यार्थ्यांच्या बाबतीत 'इलिजिबल फॉर नेक्स्ट एक्झाम'चा प्रकार घडला आहे. यासाठी परीक्षा केंद्र असलेले इन्स्टिट्यूटच जबाबदार असल्याचा आरोप संगणक टायपिंग केंद्र संचालकांकडून केला जात आहे. तांत्रिक किंवा इंटरनेटसह इतर दोषांमुळे विद्यार्थ्यांचा पेपर सबमिट झाला नसावा, अशी काही कारणे यासाठी सांगितली जात आहेत. मात्र, यात विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. पुढील परीक्षेकरिता या विद्यार्थ्यांना पुन्हा सहा महिने थांबावे लागणार आहे. शिवाय परीक्षा व इतर शुल्क भरावे लागेल काय, याविषयीसुद्धा संभ्रम आहे.
परीक्षेचा खर्च ४७०० रुपये
सदोष गुणपत्रिका हाती आलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा हीच परीक्षा द्यायची झाल्यास चार हजार ७०० रुपयांचा भुर्दंड पडणार आहे. यामध्ये १०० रुपये प्रवेश, ५०० रुपये परीक्षा, ५०० रुपये सामग्री फी आणि सहा प्रॅक्टिसचे ३६०० (दरमहा ६०० रुपये सहा महिने) रुपये खर्चाचा समावेश आहे. दुसरीकडे 'इलिजिबल फॉर नेक्स्ट एक्झाम' याचा अर्थ वेगवेगळा काढला जात आहे. ही परीक्षा आपण पास झालो, पुढील परीक्षेसाठी पात्र ठरलो, असेही समजून घेतले जात आहे.
सदोष निकालासाठी परीक्षा केंद्रावरील आयटी टीचर जबाबदार आहे. परिषदेच्या चुकीच्या धोरणामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक व मानसिक खच्चीकरण होत आहे, ऑनलाईन निकालाच्या तारखेपासूनच या विद्यार्थ्यांना बिनशर्त निकाल देण्यात यावा. विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा प्रश्न लावून धरला जाईल.
- तुळशीदास खसाळे, अध्यक्ष, यवतमाळ जिल्हा वाणिज्य शिक्षण संस्थांची संघटना