यवतमाळ जिल्हा परिषदेत भाजप सदस्यांचा गोंधळ, सभागृहातच ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 02:01 PM2020-08-20T14:01:34+5:302020-08-20T14:02:05+5:30
गुरुवारी यवतमाळात जिल्हा परिषदेची ऑनलाईन सर्वसाधारण सभा शिवसेनेचे अध्यक्ष कालिंदा पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेतली जात होती. परंतु भाजपच्या सदस्यांनी सुरुवातीलाच सभागृहात प्रचंड गोंधळ घातला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गुरुवारी यवतमाळात जिल्हा परिषदेची ऑनलाईन सर्वसाधारण सभा शिवसेनेचे अध्यक्ष कालिंदा पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेतली जात होती. परंतु भाजपच्या सदस्यांनी सुरुवातीलाच सभागृहात प्रचंड गोंधळ घातला. या सर्वसाधारण सभेची नोटीस न मिळाल्याचे सांगत या सदस्यांनी आधी अध्यक्ष, पदाधिकारी व सीईओंशी वाद घातला. त्यानंतर सदस्यांनी सभागृहातच ठिय्या मांडला.
जिल्हा परिषदेतील ४३ सदस्यांनी मागणी केल्यावरून गुरुवारची ऑनलाईन आमसभा घेण्याचे निश्चित झाले. ग्रामीण भागातील सदस्य आपल्या तालुक्याच्या पंचायत समितीमधून या सर्वसाधारण सभेत सहभागी होणार आहेत. परंतु भाजपचे १८ सदस्य या सभेच्या विरोधात आहेत.
नोटीस मिळाली नाही, विलंबाने मिळाली, ग्रामीण भागात नेटवर्क राहात नाही, अशी कारणे सांगत भाजप सदस्यांनी सभा रद्द करण्याची मागणी केली. त्यासाठी त्यांनी सभागृहातच ठिय्या आंदोलन सुरू केले. मात्र अध्यक्षांनी हा विरोध झुगारून राष्ट्रगीत घेऊन सभेच्या कामकाजाला सुरुवात केली. भाजप सदस्यांचे ठिय्या आंदोलन या सभेतही कायम होते.