लसीकरणात कोविशिल्ड, कोव्हॅक्सिनचा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 10:00 PM2021-04-19T22:00:14+5:302021-04-19T22:02:14+5:30
रविवारी जिल्ह्याला १७ हजार २०० लसींचा डोस प्राप्त झाला. त्यामध्ये १२ हजार कोविशिल्ड तर पाच हजार २०० कोव्हॅक्सिन लसीचा डोस आहे. पहिल्या टप्प्यात अनेकांनी कोविशिल्डची लस घेतली आहे. आता त्यांचा दुसरा डोस घेण्याचा अवधी जवळ आला आहे. काहींचा हा अवधी लोटूनही गेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना लसीकरणाला लसींचा तुटवडाच सर्वांत मोठा अडसर ठरत आहे. सुरुवातीला नागरिकांचा प्रतिसाद मिळत नव्हता. आता मात्र स्वत:हून नागरिक लसीकरण केंद्रांवर येत आहे. त्यांना देण्यासाठी पुरेशी लस उपलब्ध नाही. त्यातच आता कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन असा गोंधळ उडत आहे. जिल्ह्यात जवळपास १ लाख ८२ हजार नागरिकांचे लसीकरण झाले. त्यामध्ये ९० हजार ग्रामीण भागातील नागरिक आहेत. लस अपुरी पडत असल्याने वारंवार नियोजन बदलावे लागत आहेत.
रविवारी जिल्ह्याला १७ हजार २०० लसींचा डोस प्राप्त झाला. त्यामध्ये १२ हजार कोविशिल्ड तर पाच हजार २०० कोव्हॅक्सिन लसीचा डोस आहे. पहिल्या टप्प्यात अनेकांनी कोविशिल्डची लस घेतली आहे. आता त्यांचा दुसरा डोस घेण्याचा अवधी जवळ आला आहे. काहींचा हा अवधी लोटूनही गेला आहे. आरोग्य विभागाने लसींची सरमिसळ होऊ नये यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर कोविशिल्ड लस ठेवली आहे तर ग्रामीण रुग्णालय व शहरातील केंद्रांवर कोव्हॅक्सिन ही लस दिली जात आहे. शहरातील नागरिकांना आता कोविशिल्डचा दुसरा डोस घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रावर जाण्याची वेळ आली आहे. एकाच वेळी दोनप्रकारच्या लसींचे आयडी कार्यान्वित केले आहे.
त्यामुळे आरोग्य यंत्रणेचीही तारांबळ उडत आहे. हे नियोजन करण्यासाठी पुरेसा लससाठा उपलब्ध असणे आवश्यक आहे. अनेक नागरिक दुसरा डोस घेण्यासाठी शहरातील केंद्रांवर जातात. मात्र, तिथे कोविशिल्ड नसल्याने त्यांना परत यावे लागत आहे. आरोग्य विभागाकडून आता लसीकरणासाठी स्वतंत्र आयडी वापरण्याकरिता सम-विषम दिवसांचे नियोजन केले जाणार आहे. या नियोजनातून लसीकरणाचा गोंधळ संपण्याची अपेक्षा आहे.
ग्रामीणमध्ये कोविशिल्ड, शहर कोव्हॅक्सिन
लसीकरणाचा साठा पुरेसा नसल्याने आता वेगवेगळ्या लसीचे दोन आयडी एकाच वेळी चालवावे लागत आहे. यामुळे गफलत होण्याचा धोका वाढला आहे. लसीचा दुसरा डोस घेताना पहिल्यांदा जी लस घेतली, त्याच कंपनीचा दुसराही डोस आवश्यक आहे. त्यासाठीचे नियोजन करावे लागणार आहे. सध्या ग्रामीणमध्ये कोविशिल्ड तर शहरी भागात कोव्हॅक्सिन लस दिली जात आहे. एकाच आठवड्यात ठराविक दिवस निश्चित करून लसींचे आयडी वापरले जाणार आहेत.