काँग्रेसमधील गटबाजी पराभवानंतरही संपेना !

By admin | Published: November 14, 2015 02:41 AM2015-11-14T02:41:08+5:302015-11-14T02:41:08+5:30

काँग्रेसमध्ये एरव्ही गटबाजी दिसत असली तरी प्रत्येक पराभवानंतर काँग्रेसची नेते मंडळी एकजुटीने कामाला लागल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे.

Congestion clash over defeat! | काँग्रेसमधील गटबाजी पराभवानंतरही संपेना !

काँग्रेसमधील गटबाजी पराभवानंतरही संपेना !

Next

यवतमाळ : काँग्रेसमध्ये एरव्ही गटबाजी दिसत असली तरी प्रत्येक पराभवानंतर काँग्रेसची नेते मंडळी एकजुटीने कामाला लागल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. परंतु यावेळी लोकसभा, विधानसभा व आता नगरपंचायतीमध्ये सपाटून मार खालल्यानंतरही काँग्रेस नेत्यांमध्ये एकजूट दिसत नाही. उलट त्यांच्यातील स्पर्धा, रस्सीखेच व गटबाजीचेच दर्शन अधिक होत असल्याचे पहायला मिळते.
काँग्रेस पक्षाकडे सत्ता असली की नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गट-तट पहायला मिळतात. नेत्यांच्याच पावलांवर पाऊल ठेऊन पदाधिकारी व कार्यकर्ते वाटचाल करतात. परंतु कोणत्याही निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या वाट्याला पराभव आल्यानंतर मात्र ही नेते मंडळी एका छत्राखाली येऊन पक्षासाठी काम करीत असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. यावेळी मात्र या परंपरेच्या अगदी विपरित घडताना दिसत आहे. लोकसभेमध्ये काँग्रेसचा सुपडासाफ झाला. त्यानंतर सहा महिने त्यांच्या हाती होते. मात्र त्यांच्यात एकजूट दिसली नाही. त्याचा परिणाम विधानसभेत झाला. यवतमाळ जिल्ह्यात तर पाचही जागा काँग्रेसच्या हातून गेल्या. परंतु त्यातून काँग्रेसच्या नेत्यांनी कोणताच धडा घेतला नाही. पराभवानंतर एकजूट होण्याची परंपरा त्यांनी खंडित करीत एकमेकांच्या विरोधात छुपी मोर्चेबांधणी कायम ठेवली. जिल्ह्यात नुकत्याच सहा नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. मात्र तेथेसुद्धा पाच ठिकाणी काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. बाभूळगावातही मतदारांनी काँग्रेसला बहुमतापासून दोन हात दूरच ठेवले. कालपर्यंत ग्रामपंचायती असलेल्या या संस्था बहुतांश काँग्रेसच्याच ताब्यात होत्या. वर्षानुवर्षे तेथे काँग्रेस नेत्यांच्या नेतृत्वातील पॅनलचीच सत्ता राहिली. परंतु नगरपंचायती होताच तेथील काँग्रेसची सत्ता भाजपा-सेनेने उलथवून लावली. सहा पैकी केवळ एका नगरपंचायतीची काँग्रेसला संमिश्र प्रतिसाद मिळाला. काँग्रेस नेते मात्र लोकसभा, विधानसभेच्या तुलनेत नगरपंचायतीमध्ये पक्षाची स्थिती चांगली राहिल्याचे सांगून स्वत:च स्वत:चे समाधान करून घेताना दिसत आहे. नगरपंचायतीमध्ये १०२ पैकी २९ जागा भाजपाला तर २७ काँग्रेसला मिळाल्या. या २७ जागा म्हणजे काँग्रेस शून्यावरून ५० टक्क्यावर आल्याचे नेते सांगत आहे. परंतु या पराभवानंतरही काँग्रेस नेत्यांची गटबाजी थांबायचे नाव घेत नाही. उलट त्यांच्यामध्ये कुठे उघड तर कुठे छुपी स्पर्धा पहायला मिळते.
सध्या जिल्हा काँग्रेस कमिटीला नवीन अध्यक्ष आणि त्यानंतर येणाऱ्या विधान परिषद (स्थानिक स्वराज्य संस्था) निवडणुकीचे वेध लागले आहेत. आता पुढील चार वर्ष कोणतेच काम नसल्याने अनेक जण जिल्हाध्यक्ष होण्यासाठी उत्सुक आहेत. काँग्रेस पक्षाच्या राजकीय रणांगणातील एका नेत्याने तर आधी जिल्हाध्यक्ष व नंतर विधान परिषदेचे तिकीट असे दुहेरी टार्गेट आपल्या ‘दूरदृष्टी’पुढे ठेवले आहे. विधान परिषद लढविण्याची अनेकांची मनिषा आहे. त्या दृष्टीने त्यांनी छुपी चाचपणी व मोर्चेबांधणीही चालविली आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थेपूर्वी सर्वच राजकीय पक्ष अमरावती विभागाच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्यात भाजपाच्या रणजित पाटलांना चीत करण्यासाठी काँग्रेसमध्ये एका जुन्या दीर्घ अनुभवी व अभ्यासू नेत्याला रणांगणात उतरविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Congestion clash over defeat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.