राकाँ-भाजपच्या कुबड्या घेऊनही काँग्रेस हरली

By admin | Published: January 21, 2016 02:16 AM2016-01-21T02:16:10+5:302016-01-21T02:16:10+5:30

तालुक्याच्या सहकार क्षेत्रावर कित्येक वर्ष वर्चस्व राहिलेल्या काँग्रेसची हालत खस्ता झाली आहे.

Congress also lost the Congress-BJP humpback | राकाँ-भाजपच्या कुबड्या घेऊनही काँग्रेस हरली

राकाँ-भाजपच्या कुबड्या घेऊनही काँग्रेस हरली

Next

किशोर वंजारी नेर
तालुक्याच्या सहकार क्षेत्रावर कित्येक वर्ष वर्चस्व राहिलेल्या काँग्रेसची हालत खस्ता झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाच्या कुबड्या घेऊनही या पक्षाला बहुमत तर दूर जवळपासही पोहोचता आले नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने या पक्षाची शक्ती दिसून आली. एवढेच नव्हे तर शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याची या युतीची खेळी फसली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार क्षेत्रावर काँग्रेसचा दबदबा होता. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाला हा पक्ष जवळही करत नव्हता. आता मात्र काँग्रेसची या पक्षाशी चांगलीच गट्टी जमली आहे. स्वत:ची ताकद कमी पडत असल्याचे पाहून जुळवून घेतले खरे, मात्र त्यातही यश मिळत नसल्याचे दिसून येत आहे. याउलट तालुक्यात शिवसेनेची ताकद दिवसागणिक वाढत आहे.
खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत मिळविलेल्या विजयाने हुरळून जात बाजार समितीसाठीही काँग्रेस-राकाँ-भाजपा एकत्र आली. खविसंच्या निवडणुकीत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ही खेळी खेळली गेली. यात त्यांना विजय मिळाला. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीसाठीही हीच रणनीती आखली गेली. मात्र यश आले नाही. केवळ चार जागांवर या युतीला समाधान मानावे लागले. दुसरीकडे शिवसेनेने तब्बल १५ जागा जिंकत सहकार क्षेत्रावर पुन्हा आपला झेंडा रोवला.
बाजार समितीच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे तळ ठोकून होते. जिल्हा परिषद सदस्य राहुल ठाकरे यांनीही प्रचंड मेहनत घेतली. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही प्रयत्नांची पराकाष्टा केली. मात्र यश आले नाही. एकेकाळी काँग्रेसपुढे कुणाचाही थारा लागत नव्हता. माणिकराव ठाकरे यांचा तालुक्याशी संपर्क तुटल्यानंतर काँग्रेस खिळखिळी होत गेली. नगरपालिका, बहुतांश ग्रामपंचायती या पक्षाच्या हातातून गेल्या. त्यामुळे कार्यकर्त्यांची वाणवा असलेल्या भाजपाशी जुळवून घेत या पक्षाला निवडणूक लढवावी लागत आहे.
वास्तविक नेर बाजार समितीत शेतकऱ्यांना विविध प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. व्यापारी आणि दलाल यांच्यात हातमिळवणी असल्याने शेतकऱ्यांना पैशासाठी कित्येक महिने चकरा माराव्या लागतात. नियोजनाचा अभाव याठिकाणी प्रामुख्याने दिसून येतो. बाजार समितीच्या कार्यप्रणालीला शेतकरी कंटाळले. तरीही त्यांनी काँग्रेसवर विश्वास टाकला नाही. काँग्रेसने या प्रश्नांसाठी कधीही मोर्चे, आंदोलने केली नाही, शेतकऱ्यांशी संवाद साधला नाही. त्यामुळेच या पक्षाला सत्तेपासून याहीवेळी दूर राहावे लागले. शिवसेनेवर पुन्हा विश्वास दाखवित काँग्रेस-राकाँ-भाजप युतीला बाहेरची वाट दाखविली.

Web Title: Congress also lost the Congress-BJP humpback

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.