काँग्रेस मेळाव्यावर दुसऱ्या फळीतील नेत्यांचा बहिष्कार
By admin | Published: July 19, 2014 01:46 AM2014-07-19T01:46:08+5:302014-07-19T01:46:08+5:30
शुक्रवारी काँग्रेसच्या येथे पार पडलेल्या जिल्हा
बंडाचे निशाण कायम : कार्यकर्त्यांना ऐनवेळी निमंत्रण
यवतमाळ : शुक्रवारी काँग्रेसच्या येथे पार पडलेल्या जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यावर दुसऱ्या फळीतील नेत्यांनी जणू अघोषित बहिष्कार घातला होता. कुणीही असंतुष्ट नेता या मेळाव्याकडे फिरकला नाही. याचीच चर्चा मेळाव्यात होती.
काँग्रेसच्या नवनियुक्त विधान परिषद सदस्यांचा सत्कार, लोकसभेत निवडून आलेल्या खासदारांचा सत्कार आणि कार्यकर्ता मेळावा असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. मात्र दोन विधान परिषद सदस्य वगळता कुणीही निमंत्रित या सत्काराकडे फिरकले नाही. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात विद्यमान मंत्री-आमदार विरुद्ध दुसऱ्या फळीतील नेते असा वाद सुरू आहे. मध्यंतरी स्वाक्षरी मोहीम राबवून हा वाद मिटल्याचे चित्र निर्माण केले गेले. परंतु प्रत्यक्षात हा वाद कायम असल्याचे आज मेळाव्यात पहायला मिळाले. दुसऱ्या फळीतील १६ नेत्यांपैकी केवळ दोन सदस्य मेळाव्याला उपस्थित होते. या दोघांनीही जिल्हाध्यक्ष कायम ठेवण्याच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. दुसऱ्या फळीतील नेत्यांचा हा बहिष्कार पुढे कोणते वळण घेतो याकडे लक्ष लागले आहे. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना हटविण्यात यावे, विद्यमान मंत्री-आमदार व त्यांच्या पूत्रांना आगामी विधानसभेची उमेदवारी देऊ नये, अशी मागणी करीत दुसऱ्या फळीतील नेत्यांनी उघड बंड पुकारले होते. मेळाव्यावर बहिष्कार टाकून बंडाचे निशाण कायम असल्याचे या नेत्यांनी दाखवून दिले.
दिग्रस-दारव्हा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक एका कार्यकर्त्याला या मेळाव्याच्या आयोजनासाठी ‘बकरा’ बनविण्यात आल्याची चर्चा मेळावा स्थळी होती. उमेदवारी मिळण्याच्या आशेने या कार्यकर्त्यानेही अगदी घरच्या लग्नाप्रमाणे या मेळाव्याची तयारी केली होती.
या मेळाव्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे, पीरिपाचे अध्यक्ष आमदार जोगेंद्र कवाडे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वामनराव कासावार, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, विधान परिषद उपाध्यक्ष आमदार वसंतराव पुरके, आमदार नंदिनी पारवेकर, आमदार विजय खडसे, माजी मंत्री संजय देशमुख, आमदार हरिभाऊ राठोड, माजी आमदार विजयाताई धोटे, यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)
1 काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यात दरी वाढली आहे. ही कमी करणे आवश्यक आहे. ही दरीच लोकसभेतील पराभवाला कारणीभूत ठरली.
2जिल्ह्यात कोरड्या दुष्काळाचे सावट असूनही वीज कंपनी शेतकऱ्यांमागे देयक भरण्यासाठी तगादा लावत आहे. हा प्रकार थांबला पाहिजे. काँग्रेसच्या सरकारमध्ये आपण नेत्यांनी पदे भोगली. मात्र कार्यकर्त्यांना सन्मानाचे पद देऊ शकलो नाही. शासकीय समित्या व कार्यकारिणीचे गठण होऊ शकले नाही.
3लोकसभेत आपला पराभव झाला. तरीही चांगली मते घेतल्याचे समाधान आहे. नेते व कार्यकर्त्यांमध्ये आता दरीच उरली नाही, कारण कार्यकर्ते हे नेत्यांसारखे आणि अगदी नेत्यांच्या बरोबरीत राहतात. त्यामुळे कार्यकर्ता कोण आणि नेता कोण हे ओळखणे कठीण आहे.
4 यवतमाळच्या जिल्हाध्यक्षांचे राज्यात सर्वात चांगले काम आहे. जिल्ह्यात कुठेच गटबाजी नाही. त्यांच्या कार्यकाळात पक्षाचे अधिक आमदार निवडून आले. त्यांनी पक्षासाठी घर दिले, आता काय लंगोट सोडून देणार आहेत ? पावसासाठी ईश्वराकडे प्रार्थना करणे एवढेच आपल्या हातात आहे.
5दुसऱ्या फळीतील नेत्यांनी थेट प्रसार माध्यमांकडे जाण्याची आवश्यकता नव्हती. जिल्ह्यात प्रदेशाध्यक्ष, मंत्री, आमदार असे अनेक पर्याय उपलब्ध आहे. विरोधी पक्षात तर स्वत:चे मत मांडण्याची सोयच नाही. थेट आदेशच धडकतो. तेथे नेत्यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेण्याची कुणाचीच बिशाद नाही. काँग्रेस पक्षात कार्यकर्त्यांसाठी आता शिस्त असण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.
6आजच्या काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यातून नवीन आशा, नवे मार्ग निर्माण होतील. नेत्यांनी कार्यकर्त्यांना महत्व दिले पाहिजे. नेत्यांनी कार्यकर्त्यांचे गुणगाण करावे. कारण कार्यकर्त्यांच्या खांद्यावरच नेत्यांच्या विजयाचे गणित अवलंबून असते.
मेळाव्यात खुर्च्या तुटल्या
४काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा सुरू झाल्यानंतर काही वेळातच पाठोपाठ खुर्च्या तुटण्यास प्रारंभ झाला. खुर्चीवर बसलेले अनेक जण खुर्च्यांचे पाय तुटल्याने पडले. कार्यक्रमासाठी खुर्च्यांचा पुरवठा करणाऱ्या मंडप डेकोरेशन कंत्राटदाराच्या नावाने उपस्थित कार्यकर्ते बोटे मोडतानी दिसून आले. तर काहींनी आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या नेत्यांची अशीच गत होणार असल्याची उपरोधिक टीकाही केली.