काँग्रेसचा सत्तेचा दावा, भाजपाही प्रयत्नात
By admin | Published: March 21, 2017 12:04 AM2017-03-21T00:04:18+5:302017-03-21T00:04:18+5:30
जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी युतीची अधिकृत घोषणा झाली असताना काँग्रेसनेही आपलाच अध्यक्ष होणार असा दावा केला आहे.
जिल्हा परिषद : राजकीय गोंधळाची स्थिती, संख्याबळ जुळविण्याचे आव्हान
यवतमाळ : जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी युतीची अधिकृत घोषणा झाली असताना काँग्रेसनेही आपलाच अध्यक्ष होणार असा दावा केला आहे. त्यासाठी संख्याबळ जुळविता यावे म्हणून जोडतोड केली जात आहे.
शिवसेनेने भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याची तयारी केली. तोच पॅटर्न भाजपानेही वापरला आहे. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला जिल्हा परिषदेतील सत्तेचा लाभ घेऊ देऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात आहे. राष्ट्रवादी आपल्यासोबत असल्याचा दावा सेनेने राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या उपस्थितीत केला असताना काँग्रेसनेही राष्ट्रवादी आमच्यासोबत सत्ता स्थापन करणार असल्याचे सांगितल्याने राष्ट्रवादी नेमकी कुणासोबत असा पेच निर्माण झाला आहे. काँग्रेसचा हा दावा पाहता राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये दोन गट पडल्याचे दिसून येते. एक गट सेनेसोबत तर दुसरा गट पक्षाच्या गटनेत्यासह भाजपाला अनुकूल असल्याचे चित्र आहे. भाजपानेही सत्तेसाठी अखेरपर्यंत प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. काँग्रेस-भाजपा-अपक्ष-राष्ट्रवादीतील एक सदस्य यांनी एकत्र येऊन जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करण्याची मोर्चेबांधणी चालविली आहे. त्याचवेळी शिवसेनेकडून आम्ही काँग्रेसचे काही सदस्य फोडल्याचा दावा केला जात असल्याने राजकीय गोंधळात आणखी भर पडली आहे. संख्याबळ जुळो अथवा नाही काँग्रेस अध्यक्षपदाचा उमेदवार देणार, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार वामनराव कासावार यांनी स्पष्ट केले आहे. एकूणच रस्सीखेच पाहता जिल्हा परिषदेत प्रत्यक्ष मतदानानंतरच सत्ता कुणाची हे स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत. सर्वच पक्ष सत्तेचा दावा करीत असल्याने व काही घोषणा करुनही वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याने हा गोंधळ वाढला आहे. रात्रीतून आणखी वेगळे समीकरण तयार होण्याची शक्यता आहे.
धक्कातंत्राची चिन्हे
जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना व राष्ट्रवादीने सत्ता स्थापनेची अधिकृत घोषणा केली असली तरी अखेरच्या क्षणी धक्कातंत्र अवलंबिले जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार अध्यक्ष काँग्रेसचा, उपाध्यक्ष भाजपाचा करण्याची तयारी आहे. राष्ट्रवादीतील एकाला सभापतीपद, अपक्षाला सभापतीपद तर अन्य दोन सभापती काँग्रेस व भाजपाला देण्याची व्युहरचना आहे. त्यासाठी संख्याबळ जुळविले गेले.
जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीचीच सत्ता बसणार व काँग्रेसचाच अध्यक्ष होणार.
- माणिकराव ठाकरे,
उपसभापती विधान परिषद.
भाजपासोबत बसण्यास काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा विरोध आहे. मात्र माणिकराव ठाकरे आग्रही आहेत. पण काँग्रेसचा निर्णय एकमताने होईल.
- अॅड. शिवाजीराव मोघे
माजी मंत्री
सेना-राष्ट्रवादी युतीची घोषणा ऐकली. परंतु भाजपा अखेरपर्यंत आपले प्रयत्न कायम ठेवणार आहे.
- मदन येरावार
पालकमंत्री यवतमाळ