मारेगावात काँग्रेसने बाजी मारली
By admin | Published: February 24, 2017 02:37 AM2017-02-24T02:37:33+5:302017-02-24T02:37:33+5:30
तालुक्यातील दोन जि.प. गट व पं. स.च्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने कुंभा-मार्डी व बोटोणी-वेगाव गटातील दोनही जागांवर यश प्राप्त केले,
गणात काँग्रेसला दोन जागा : शिवसेना, भाजपाला प्रत्येकी एक जागा
अण्णाभाऊ कचाटे मारेगाव
तालुक्यातील दोन जि.प. गट व पं. स.च्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने कुंभा-मार्डी व बोटोणी-वेगाव गटातील दोनही जागांवर यश प्राप्त केले, तर मार्डी व वेगाव गणात काँग्रेसचे दोन, तर कुंभा गणात शिवसेना व बोटोणी गणात भाजपाचा उमेदवार विजयी झाला.
जिल्हा परिषदेचे दोन गट व पंचायत समितीच्या चार गणांसाठी झालेल्या निवडणुकीचा गुरूवारी निकाल घोषित झाला. यात बोटोणी-वेगाव गटातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अनिल जनार्धन देरकर ७०७३ मते घेऊन विजयी झालेत. त्यांनी भारतीय जनता पार्टीचे रमन डोये यांचा १७४६ मतांनी पराभव केला. येथे शिवसेना तिसऱ्या स्थानावर राहिली.
बोटोणी गणातून भारतीय जनता पार्टीच्या सुनिता शंकर लालसरे ३१७० मते घेऊन विजयी झाल्या. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माया पेंदोर यांचा १४६ मतांनी पराभव केला. वेगाव गणातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या शितल रवींद्र पोटे ३५९८ मते घेऊन विजयी झाल्यात. त्यांनी भाजपाच्या रूपाली विश्वजित गारघाटे यांचा १११७ मतांनी पराभव केला. संपूर्ण तालुक्याचे लक्ष केंद्रीत झालेल्या कुंभा-मार्डी गटातील वर्चस्वाच्या लढाईत काँग्रेसच्या अरूणा अरूण खंडाळकर ८३४८ मते घेऊन विजयी झाल्यात. त्यांनी शिवसेनेच्या डिमन टोंगे यांचा दोन हजार ९८५ मतांनी पराभव केला. कुंभा गणातून शिवसेनेचे संजय आवारी ३६२१ मते घेऊन विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती गजानन खापने यांचा ७१८ मतांनी पराभव केला. मार्डी गणातून काँग्रेसचे श्रीकृष्ण कुमरे ४४८४ मते घेऊन विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे विठ्ठल कोयचाडे यांचा २०२१ मतांनी पराभव केला.
सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई म्हणूनच पाहिली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीला खातेही उघडता आले नाही, तर कुंभा, मार्डी गणात त्यांना उमेदवारही मिळाला नाही. यावेळी काँगे्रसचे गट एकत्र आल्यानेच त्यांना यश प्राप्त करता आल्याचे समजते. त्यामुळे इतर पक्षातील दिग्गजांना पराभवांना सामोरे जावे लागले. यात शिवसेना तालुका प्रमुख गजानन किन्हेकर, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, काँग्रेसचे विद्यमान उपसभापती गजानन खापने, भाजपाचे महामंत्री रमण डोये, महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्ष माया पेंदोर यांना पराभव पत्करावा लागला.
यापूर्वी पंचायत समितीमध्ये काँग्रेस दोन, शिवसेना दोन, असे पक्षीय बलाबल होते. यावेळी काँग्रेस दोन, शिवसेना एक, भाजपा एक, असे पक्षीय बलाबल राहणार आहे. त्यामुळे बहुमत कुणालाही नाही.