नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडे सूचकच नाही
By admin | Published: July 16, 2014 12:28 AM2014-07-16T00:28:16+5:302014-07-16T00:28:16+5:30
यवतमाळ नगरपरिषदेत काँग्रेसकडून राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याचा कांगावा केला जात आहे. मुळात काँग्रेसला नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल करण्यासाठी अनुमोदक व सूचक मिळाला नाही.
यवतमाळ : यवतमाळ नगरपरिषदेत काँग्रेसकडून राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याचा कांगावा केला जात आहे. मुळात काँग्रेसला नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल करण्यासाठी अनुमोदक व सूचक मिळाला नाही. त्यामुळे अगतिक झालेल्या काँग्रेसकडून अशी प्रतिक्रिया दिली जात आहे, असे राष्ट्रवादीचे आमदार संदीप बाजोरिया यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
नगरपरिषदेत शहर विकास आघाडीकडून नगराध्यक्षपदासाठी सुभाष राय यांचे नाव निश्चित करण्यात आले. बाळासाहेब चौधरी व त्यांच्या समर्थनार्थ असलेल्या सात नगरसेवकांनी सुरुवातीलाच सुभाष राय यांना पाठिंबा दिला. या उलट काँग्रेसच्या महिला नगरसेविकेने अध्यक्षपदासाठी आघाडीतील काही नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना यश आले नाही. विकासाच्या मुद्यावर राष्ट्रवादीने भाजप, बसपा नगरसेवकांची शहर विकास आघाडी तयार केली होती. आघाडीत ठरल्याप्रमाणे एक वर्ष भाजपचा नगराध्यक्ष त्यानंतर राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष व पुढील अडीच वर्षही अशीच विभागून घेण्याचे ठरले होते. मात्र भाजपच्या नगराध्यक्षाने शब्द पाळला नाही. त्यामुळे आता अडीच वर्षासाठी राष्ट्रवादीचाच नगराध्यक्ष राहणार आहे, असे आमदार संदीप बाजोरिया यांनी सांगितले.
नगराध्यक्षासाठी ९ जुलै आणि त्यानंतर ११ जुलै रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष होत असल्याचे सांगितले. त्यावर कुठलीही काळजी करू नका, एवढेच फक्त माणिकराव ठाकरे यांनी सांगितले आणि दुसरीकडे काँग्रेस नगरसेवकाला अध्यक्ष बनविण्याची हालचाल सुरू केली. मुळात काँग्रेसने राष्ट्रवादीविरोधातच नेहमी भूमिका घेतली आहे. अविश्वास प्रकरणात काँग्रेसने योगेश गढियाला साथ दिली होती.
नगराध्यक्ष निवडणुकीसाठीही काँग्रेस नगरसेवक अमन निर्बाण यांनी दोन उमेदवारी अर्ज घेतले होते. मात्र अनुमोदक सूचकच नसल्याने त्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पत्रपरिषदेला नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुभाष राय, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाना गाडबैले, बाळासाहेब चौधरी, स्वीकृत नगरसेवक सुमीत बाजोरिया, देवीदास अराठे, अमोल देशमुख, दत्ता कुळकर्णी, अरुणा गावंडे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नरेश ठाकूर, सुरेश चिंचोळकर आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)