नगरपरिषदेविरूद्ध काँग्रेसचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 11:17 PM2017-11-22T23:17:38+5:302017-11-22T23:19:02+5:30
नगरपरिषदेत समाविष्ट क्षेत्रातील मूलभूत सुविधा पूर्ण करण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ काँग्रेस नगरसेवकांनी बुधवारी पालिकेसमोर उपोषण केले.
ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : नगरपरिषदेत समाविष्ट क्षेत्रातील मूलभूत सुविधा पूर्ण करण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ काँग्रेस नगरसेवकांनी बुधवारी पालिकेसमोर उपोषण केले. नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी महिनाभरात समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.
लोहारा परिसरातील प्रभाग क्रमांक २६ मध्ये विकास कामे होत नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. या प्रभागातील नागरिकांनी वैयक्तिक शौचालय बांधले. मात्र त्यांना अद्याप अनुदानाचे धनादेश मिळाले नाही. याच प्रभागातील दारव्हा रोडवरील रस्ता जीवन प्राधिकरणाच्या नालीमुळे धोक्यात आला. या संदर्भात वारंवार सूचना देऊनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रभागातील खड्डामय रस्त्याची डागडुजी केली जात नाही. प्रभागातील स्वच्छतेकरिता शिपाई मिळत नाही. यामुळे अस्वच्छता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या संपूर्ण प्रकाराकडे नगरपरिषदेने दुर्लक्ष केल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. या समस्यांच्या सोडवणुकीसाठी नगरसेवक बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात नगरसेविका दर्शना इंगोले, वैशाली सवई, नगरसेवक सलीम सागवान, जावेद अन्सारी, पल्लवी रामटेके, शब्बीर खान, ताहिराबी हबीब खान, नसीमा बानो शक्वीर, मोहसीन खान, उषा दिवटे आदींनी उपोषणात सहभाग नोंदविला. जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरीताई आडे, माजी अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, राहुल ठाकरे, माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, माजी सभापती अरूण राऊत, अनिल गायकवाड, संजय ठाकरे आदींनी उपोषण मंडपाला भेट दिली.