रेती घाट धाडीत चांदूररेल्वे काँग्रेसचे अर्थ-राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 11:24 PM2018-05-31T23:24:36+5:302018-05-31T23:24:36+5:30
बाभूळगाव तालुक्यातील रेती घाटांवर विभागाबाहेरील एसडीओंकडून धाडी घालण्याच्या प्रकरणामागे अमरावती जिल्ह्याच्या चांदूररेल्वे येथील काँग्रेसचे राजकारण आडवे आल्याचे सांगितले जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बाभूळगाव तालुक्यातील रेती घाटांवर विभागाबाहेरील एसडीओंकडून धाडी घालण्याच्या प्रकरणामागे अमरावती जिल्ह्याच्या चांदूररेल्वे येथील काँग्रेसचे राजकारण आडवे आल्याचे सांगितले जाते. दरम्यान या प्रकरणात निष्क्रीयतेचा ठपका ठेवत बाभूळगावचे तहसीलदार दिलीप झाडे यांना विभागीय आयुक्तांनी बुधवारी निलंबित केले.
बाभूळगाव तालुक्याच्या वाटखेड येथील दोनही रेती घाटांवर पुसदचे एसडीओ नितीन हिंगोले यांच्या नेतृत्वातील महसूल पथकाने धाडी घातल्या होत्या. याच प्रकरणात बाभूळगाव तहसीलदार दिलीप झाडे निलंबित झाल्याने आता या धाडींमागील राजकारण व अर्थकारण पुढे येऊ लागले आहे. सूत्रानुसार, यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव, राळेगावच्या रेती घाटांबाबत चांदूररेल्वेतील काँग्रेसच्या नेत्याकडून सातत्याने तक्रारी केल्या जातात. वरवर याला काँग्रेसविरुद्ध सेना या राजकारणाची झालर दिसत असली तरी प्रत्यक्षात त्याचे मूळ अर्थकारणात दडून असल्याचे सांगितले जाते. वाटखेडचा घाट क्र. १ हा शिवणी-रसूलापूर (ता. नांदगाव खंडेश्वर जि. अमरावती) येथील शिवसेना कार्यकर्त्याने घेतला आहे. तर तेथीलच दुसऱ्या घाटाचे कनेक्शन पुलगावमध्ये आहे.
या घाटांबाबत बाभूळगाव, यवतमाळचे महसूल अधिकारी सलोख्याची भूमिका घेत असल्याचे सांगत थेट विभागीय महसूल आयुक्तांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. आयुक्तांच्या आदेशावरून मग दुसऱ्या विभागातील एसडीओंमार्फत घाटावर धाडी घालण्यात आल्या. तेथून ३१ ट्रक जप्त करण्यात आले. हे सर्व ट्रक रिकामे असून केवळ एकामध्ये दोन ब्रास रेती आहे. त्याचीही रॉयल्टी भरलेली आहे. घाटावरून अन्य सात ट्रक पसार झाले. या प्रकरणात घाट मालकाविरुद्ध भादंवि ३७९ कलमान्वये चोरीचा गुन्हा नोंदविला गेला. त्याचवेळी प्रत्येक ट्रकला एक लाखांचा दंड लावण्यात आला. एकाच प्रकरणात दोन प्रकारची कारवाई कशी असा प्रश्न उपस्थित करीत घाट मालकांनी आता थेट उच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी चालविली आहे. नियमानुसार ६ वाजेपर्यंत घाटावर वाहने उभी राहू शकतात. एसडीओंची धाड ५ वाजता पडली होती. त्यावेळेतील पंचनामा, चालकांनी घाट मालकांना केलेल्या मोबाईल कॉलचे रेकॉर्ड आहे. असे असताना कागदावर या धाडी सायंकाळी ७ वाजता दाखवून सर्व ट्रकवर जप्तीची कारवाई करण्यात आली. हे ट्रक बाभूळगाव पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहे.
राळेगाव तालुक्यातील रेती घाटांवर सर्वाधिक ‘उलाढाल’
जिल्ह्यात बहुतांश तालुक्यात रेती घाट सुरू असून उत्खननही मोठ्या प्रमाणात होत आहे. बाभूळगाव व राळेगाव या दोनच तालुक्यात डझनावर घाट आहेत. त्यातही राळेगाव तालुक्यात रेती घाटावर सर्वाधिक ‘उलाढाल’ होत असल्याची माहिती आहे. उलाढालीचा हा आकडा पाहूनच घाटावर खंडणी, धमक्या, मारहाण, गोळीबार, पोलिसात तक्रारी, जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईचे निवेदन ंआदी प्रकार होत आहे. चांदूररेल्वेतील काँग्रेसच्या गोटातून होणारे राजकारण, अर्थकारण व त्यातील तक्रारींना कंटाळून अनेक घाट मालकांनी तो तालुका सोडून आता यवतमाळ जिल्ह्यात बाभूळगाव, राळेगाव तालुक्यातील घाटांवर लक्ष केंद्रीत केले आहे. मात्र त्यानंतरही चांदूररेल्वेतून त्यांचा पिच्छा पुरविला जात आहे.