उमरखेड बाजार समितीवर काँग्रेसचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 09:51 PM2018-10-29T21:51:47+5:302018-10-29T21:52:06+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी अत्यंत चुरशीची निवडणूक झाली. सोमवारी मतमोजणीनंतर १८ पैकी १० जागांवर काँग्रेसप्रणित परिवर्तन पॅनलचे उमेदवार विजयी झाले. शिवसेना-भाजपा युतीने सात जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर विजय मिळविला.
दत्तात्रय देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी अत्यंत चुरशीची निवडणूक झाली. सोमवारी मतमोजणीनंतर १८ पैकी १० जागांवर काँग्रेसप्रणित परिवर्तन पॅनलचे उमेदवार विजयी झाले. शिवसेना-भाजपा युतीने सात जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर विजय मिळविला.
काँग्रेस प्रणित परिवर्तन पॅनलच्या विजयी उमेदवारांमध्ये मुळावा गटातील दगडू चव्हाण, उमरखेड गटातील माया रावते, बिटरगाव ब गटातील दत्तराव रावते, विडूळ गटातील गजानन बोन्सले, ढाणकी गटातील बाळासाहेब ऊर्फ वसंत चंद्रे, निंगनूर गटातील सुनील गव्हाळे, भवानी गटातील रघुनाथ बेले व हमाल-मापारी गटातील अजमतखाँ पठाण आणि अडते व व्यापारी गटातील राधेश्याम भट्टड, विनय कोडगिरवार यांचा समावेश आहे. शिवसेना-भाजप युतीचे बेलखेड गटातील सुदर्शन ठाकरे, पोफाळी गटातील उषाताई जाधव, मार्लेगाव गटातील नारायण नरवाडे, सुकळी ज. गटातील गौतम ऊर्फ बाळासाहेब नाईक, देवसरी गटातील शामराव वानखेडे, चातारी गटातील कृष्णा देवसरकर आणि खरबी गटातील दिलीप जाधव विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अविनाश जाधव हे एकमेव उमेदवार कुरळी गटातून विजयी झाले.
सहकार प्राधिकरणाच्या नवीन नियमानुसार प्रथमच बाजार समितीची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत प्रत्येक शेतकरी सभासदाला मतदानाचा अधिकार होता. त्यामुळे मतदारांची संख्या तब्बल ६६ हजारांच्यावर होती. त्यापैकी जवळपास निम्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सोमवारी येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात सकाळी १० वाजतापासून मतमोजणी सुरू झाली. अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार भगवान कांबळे व कर्मचाऱ्यांनी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण केली. बाजार समितीवर वर्चस्व प्राप्त करताच जिल्हा परिषदेतील काँग्रेस गटनेते राम देवसरकर यांच्यासह विजयी उमेदवारांनी जल्लोष केला.
‘गड आला पण सिंह गेला’
काँग्रेसचे दत्तराव शिंदे हे सभापतीपदाचे प्रमुख दावेदार होते. मात्र देवसरी गटातून त्यांचा पराभव झाल्याने काँग्रेसची अवस्था ‘गड आला पण सिंह गेला’ अशी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमुळे काँग्रेसचे काही उमेदवार थोड्या फरकाच्या मताने पराभूत झाले आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसचे गणित बिघडविल्याने काँग्रेसला दहा जागांवरच विजय मिळाला.