Lok Sabha Election 2019; काँग्रेसने देश गरीब करण्याचे काम केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 21:49 IST2019-04-06T21:38:31+5:302019-04-06T21:49:39+5:30
काँग्रेसने देशावर ६० वर्षे राज्य केले. मात्र या ६० वर्षांत काँग्रेसने देशाला गरीब करण्याचेच काम केले, असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील आर्णी येथे शनिवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

Lok Sabha Election 2019; काँग्रेसने देश गरीब करण्याचे काम केले
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : काँग्रेसने देशावर ६० वर्षे राज्य केले. मात्र या ६० वर्षांत काँग्रेसने देशाला गरीब करण्याचेच काम केले, असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील आर्णी येथे शनिवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षात देशाची मान उंचावली. मोदी यांनी देशातील सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र काँग्रेस गेल्या ६0 वर्षांपासून जनतेला केवळ उल्लू बनवीत आहे. खोटे बोलण्यात काँग्रेस पटाईत आहे. राहूल गांधी यांना आजी, आजोबा व घराण्याची परंपरा आहे. त्याच पुण्याईवर ते तग धरून आहे. मोदी यांनी जनधन योजना आणली. प्रत्येक घरी शौचालय दिले. प्रत्येकाला घरकूल देण्याचे प्रयत्न सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी उरी घटनेनंतर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून अतिरेक्यांचा बदला घेतला. पुलवामा घटनेत शहीद झालेल्या विरांचा बदला घेण्यासाठी सैनिकांना खुली सूट दिली. हे काम काँग्रेसने ६0 वर्षे कधीच केले नाही, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.
यावेळी मंचावर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, आमदार राजू तोडसाम, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, नगराध्यक्ष अर्चना मंगाम, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, प्रभाकर जीवने, अशोक जिवतोडे, एन.टी. जाधव आदी उपस्थित होते.
दुधवाला की दारूवाला हे तुम्हीच ठरवा
चंद्रपूर मतदार संघातून दुधवाला उमेदवार विजयी करायचा की दारूवाला, हे तुम्हीच ठरवा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.