काँग्रेस नेते प्रवीण देशमुख कार अपघातात जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2023 06:38 PM2023-01-12T18:38:53+5:302023-01-12T18:39:30+5:30
Yawatmal News मुंबई बाजार समितीचे संचालक तथा काँग्रेसचे स्थानिक नेते प्रवीण देशमुख हे त्यांच्या वाहनाने नागपूरहून यवतमाळकडे येत होते. शहराजवळ आल्यानंतर ह्युंडाई शोरूमजवळ त्यांच्या कारला ट्रकने यू-टर्न करताना धडक दिली.
यवतमाळ : मुंबई बाजार समितीचे संचालक तथा काँग्रेसचे स्थानिक नेते प्रवीण देशमुख हे त्यांच्या वाहनाने नागपूरहून यवतमाळकडे येत होते. शहराजवळ आल्यानंतर ह्युंडाई शोरूमजवळ त्यांच्या कारला ट्रकने यू-टर्न करताना धडक दिली. हा भीषण अपघात बुधवार-गुरूवारच्या मध्यरात्री १:३० वाजता घडला. यात प्रवीण देशमुख व त्यांचा चालक दोघेही जखमी झाले.
नागपूर एअर पोर्टवरून एमएच २९ एडी १२१६ या क्रमांकाच्या कारने प्रवीण देशमुख यवतमाळकडे निघाले. त्यांचा चालक मंगेश पिंपळकर वाहन चालवत होता. यवतमाळ शहराजवळ आल्यानंतर अचानक एका ट्रकने यू-टर्न घेतला. यात कारला धडक बसली. कारचे मोठे नुकसान झाले. प्रवीण देशमुख व चालक मंगेश दोघेही जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. अपघातानंतर ट्रक घटनास्थळावरून पसार झाला. त्याचा क्रमांक दिसला नाही.
सीट बेल्टमुळे बचावलो
कारमध्ये बसले असताना देशमुख व त्यांचा चालक मंगेश या दोघांनीही सीट बेल्ट लावले होते. ट्रकच्या धडकेनंतर कार रस्त्याच्या खाली फेकली गेली. त्यांनी लावलेल्या सीट बेल्टमुळे मोठी हानी झाली नाही. दोघांचीही प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. प्रवीण देशमुख गुरुवारी सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन घरी परतले.