काँग्रेस नेते विधानसभा क्षेत्रात
By admin | Published: February 5, 2017 12:50 AM2017-02-05T00:50:47+5:302017-02-05T00:50:47+5:30
जिल्हा परिषदेची उमेदवारी देण्यावरून काँग्रेस नेत्यांमधील भांडणे मुंबईपर्यंत गाजली असली तरी सध्या ती बाजूला सारण्यात आली आहे.
जिल्हा परिषद निवडणूक : गटबाजी बाजूला, प्रतिष्ठा पणाला
यवतमाळ : जिल्हा परिषदेची उमेदवारी देण्यावरून काँग्रेस नेत्यांमधील भांडणे मुंबईपर्यंत गाजली असली तरी सध्या ती बाजूला सारण्यात आली आहे. या नेत्यांवर आपल्या विधानसभा क्षेत्राची जबाबदारी पक्षाने सोपविली आहे. प्रतिष्ठा राखण्यासाठी हे नेते कामाला लागले आहे.
जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांमधील गटबाजी व भांडणे सर्वश्रृत आहेत. जिल्हाध्यक्ष पदाचा वाद गाजला. त्यावर पडदा पडते तोच जिल्हा परिषदेच्या उमेदवारीवरून बरेच वादंग झाले. दप्तर आदळण्यापर्यंत प्रदेशाध्यक्षांनी जिल्ह्यातील नेत्यांच्या या गटबाजीपुढे आपला संताप व्यक्त केला. मात्र तिकीटांचे वाटप झाल्यानंतर अचानक ही गटबाजी थंडावल्याचे चित्र आहे. जणू आमच्यात गटबाजी नव्हतीच, असे भासविण्याचा प्रयत्न काँग्रेस नेत्यांकडून सुरू आहे. पक्षाने विधानसभेच्या पराभूत उमेदवारांना अर्थात काँग्रेसच्या या दिग्गज नेत्यांना आपआपल्या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे गटबाजी बाजूला सारुन हे सर्व नेते आपल्या कार्यक्षेत्रात व्यस्त आहेत. जिल्हा परिषदेच्या अधिकाधिक जागा मिळविणे व पंचायत समित्याही ताब्यात घेऊन आपले वर्चस्व सिद्ध करणे हे ध्येय या नेत्यांनी ठेवले आहे. पालकमंत्री पदाच्या फेरबदलावरून शिवसेना व भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये ठिणगी पडली आहे. त्याचा लाभ उठविण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होताना दिसतो आहे. काँग्रेस सर्वदूर पोहोचली आहे. हवेची झुळूक आली तरी पक्षाचा फायदा होईल, अशी स्थिती आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत गतवेळी पेक्षा काँग्रेसच्या जागा वाढतील, असा दावा नेत्यांकडून केला जात आहे. त्यासाठी नोटाबंदी हे प्रमुख कारण सांगितले जाते. नोटाबंदीने ग्रामीण जनतेला छळले आहे. नुकत्याच झालेल्या केंद्राच्या बजेटने जनतेच्या अपेक्षा फोल ठरविल्या आहेत. कर्जमुक्ती, शेतमालाला वाढीव भाव, जनधनच्या खात्यात ठेव या भाजपाच्या घोषणा पोकळ ठरल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. काँग्रेसच्या काळात लाल्या, खरडी, गारपीट या सारखे अनुदान सातत्याने मिळत होते. मात्र भाजपा सरकारमध्ये त्याचा अभाव आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी घरकुल योजनेची घोषणा केली गेली. मात्र प्रत्यक्षात या योजनेचे कामही सुरू झाले नाही. या उलट काँग्रेसने ऐतिहासिक निर्णय घेऊन तीन लाख घरकूल बांधल्याचे काँग्रेस नेत्यांकडून सांगितले जाते. भाजपा सरकारच्या नेत्यांची बयाणे व त्यांची एकूणच पावले आरक्षण उठविण्याकडे असल्याचा आरोप केला जात आहे. या सर्व मुद्यांवर प्रकाशझोत टाकून काँग्रेस नेते जिल्हा परिषदा बळकाविण्याचा प्रयत्न करीत आहे. काँग्रेस हाच सक्षम पर्याय असल्याचा दावा या नेत्यांकडून केला जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)